अभागी भाऊ बहीण


            हॉस्पिटलच्या बाहेर सगळे तोंडावर अगदी 'मरणकळा' घेऊन वावरत असतात. कोणाची आई, कोणाचे वडील,तर कोणा-कोणाचे भाऊ,बहिण,सासू-साासरे, ॲडमिट् असतात , तर कोणाचे मित्रंमैत्रिणीही!!! जो-तो आपल्याच दुःखात चेहरा दिग्मूढ करुन बसलेला असतो....मग सहजप्रवृत्तीने बसल्या बसल्या चौकशा सुरु होतात....तुमचं कोण ॲडमिट् आहे ?; या प्रश्नापासून सुरुवात होऊन संबंधित पेशंटचा 'जीवनपटच' एकमेकांसमोर उलगडला जातो. समोरच्याची करुण कहाणी ऐकून एकमेकांना आधार दिला जातो.त्याने कोलमडलेलं मन स्थिर व्हायला मदत होते... समोरच्याच्या दु:खापुढे आपलं दुःख काहीच नाही, असं परस्परांना वाटायला लागतं...मग एखादा नवा पेशंट भरती झाला की, हेच जुन्या पेशंटचे नातेवाईक लगेच पुढे सरसावतात..... ! परंपरांगत अलिखित नियमाने नव्याने आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांची आस्थेवाईकपणे
चौकशी करतात. समोरचा विचारु दे अगर नको ... अभावितपणे बाथरुम कुठे आहे ?, स्वस्त व चांगली खानावळ कुठे आहे?, नाष्टा कुठे चांगला मिळतो?, डॉक्टरांचा राऊंड कधी असतो?...कुठला वार्डबॉय अगर नर्स चांगली आहे ? कुणाला 'मस्का' मारला की, 'व्हिझीट'चे नियम मोडून नातेवाईकांना पेशंटला भेटायला आत सोडलं जातं ? इत्यादी अनेक बारीकसारीक माहिती तपशीलवार पुरवित असतात....आणि मग नवागत, भांबावलेला नातेवाईक निश्चिंत मनाने त्यांच्यात स्थिरावतो. 'आपण कुणाला तरी मदत केली' याचे नि 'हे नसते तर आपली किती तारांबळ झाली असती ?!,आपल्याला या लोकांची किती मदत झाली?!!' ; या दोन्हीं गोष्टीचं समाधान 'जुन्या' व 'नव्या' चेहऱ्यावर किंबहुना सारखंच दिसत असतं....! सगळ्यांत एक वेगळीच आपुलकीची भावना निर्माण होत असते. जणू सगळे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत . मग एकमेकांसोबत चहापान , जेवण करणं, कोणाचा डबा आला नसेल तर तो येईपर्यंत जेवायला थांबणे..आणि तरीही नाहीच आला तर त्याच्याशी सर्वांनी आपला डबा 'शेयर' करणे.. अंथरुण-पांघरुण देणे...असे प्रसंग तर मग नित्याचेच होऊन जातात....मग एखाद्याचा पेशंट 'ऑफ'झाला तर (हो 'ऑफच'..!!आजकाल इलेक्ट्रॉनिक साधनं वापरता वापरता आपण मानव त्या साधनांशी संबंधित परिभाषित शब्दच बोलताना सर्रास वापरु लागलो आहोत )क्षणाक्षणाला स्वत:च्या पेशंटच्या काळजीने तासंतास रडणारे आता त्या 'दु:खाची कुऱ्हाड' कोसळलेल्या नातेवाईकाला आधार देत, 'नियतीची लिला,ईश्वराची मर्जी, जन्ममरणाची अटळता' समजावू लागतात ... त्यावेळी क्षणभरासाठी त्यांना स्वत:च्या पेशंटचा,दु:खाचा विसर पडलेला असतो ! हे तुम्हीही अनुभवलं असेल कदाचित....होय ना??!!
            
            पण वरील विवेचनाच्या विपरीत अपवादात्मक परिस्थितीही आढळते. एखाद्या पेशंट सोबत 'असं' कोणच नसेल तर.....?? कल्पनाही करवत नाही ना ??!! पण असतात असे 'अभागी जीव' !! त्यातलाच एक या हॉस्पिटलमध्येही होता.....आई-वडीलांविना पोरका....वय जेमतेम वीस-बावीसच्या आसपास, रंगानं गोरा, नाक सरळ अगदी..पण शरीर नुसतं काटकीसारखं.... मळकट काळा बर्मुडा नि निळा हाफ टी-शर्ट घातलेला, जनरल वार्ड ६२च्या फरशीवर एका बेडशीटवर पाय पोटात घेऊन झोपलेला...शेजारी उशाला एक ताट होतं, त्यात पाव आणि दूध ठेवलेलं....पण त्याला त्याने हातही न लावलेला दिसत होतं. अंगावर नि त्या ताटावर माशा घोंघावत होत्या. त्या मुलाचं अंग थंडीने थरथरत होतं...त्याने बहुतेक कपड्यातच शौच व लघवी केली होती; त्यामुळेच तिथे असणारे सगळे त्याच्याकडे पाहून नाक मुरडत होते.... अगदी मी ही ! डॉक्टर ,नर्स यायच्या.. पण त्याच्याकडे लक्षच द्यायच्या नाहीत.. दुपारी फरशी पुसणारे आले तरी, त्याच्या जवळपासही फिरकायचे नाहीत; मग त्याची स्वच्छता करणे तर दूरच!! पण त्याचं ते कामच असूनही लक्ष देत नव्हते, म्हणून मनात थोडा रागच येत होता... एकंदर वातावरण पाहून तिथं उभं रहाणेही अवघड वाटत होतं. पण मला तिथं रहाणे भागच होते कारण; माझेही वडील त्याच वार्डात ॲडमिट् होते.....मग एक-दोन दिवसांत तिथं जून्या पेशंटच्या नातेवाईकांशी बोलता-बोलता डोकं सून्न करणारी त्या अभागी मुलाविषयी माहिती कळाली...
             
              त्या मुलाला 'ब्रेन ट्यूमर' होता, त्यामुळेच हळूहळू कमी कमी दिसत दिसत आता त्याला पूर्ण अंधपणा आला होता आणि हे सर्व कमी म्हणून की काय त्याला 'एड्स्' ही होता....!!!!!! मी मनात विचार केला असं कसं 'दुर्दैवी नशीब' या मुलाचं!! मला त्याच्याविषयी कणव दाटून आली व अजून काही जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा - आई-वडील वारलेला हा मुलगा मूळचा 'माण' तालुक्यातला; पण जगण्यासाठी म्हणून आटपाडीत कुणाकडे तरी भज्याच्या हातगाडीवर काम करुन पोट भरत होता. एक चुलता होता; पण त्यानं गोड बोलून याची वडिलार्जित जमीन अगदी थोड्या पैशाच्या मोबदल्यात स्वत:च्या नावावर करुन घेतलेली. कसंबसं कुणाच्या तरी आसऱ्याला राहून अभागीपणाचे भोग भोगत असताना या 'ब्रेन ट्यूमर'च्या व्याधीने डोळ्यांना दिसेनासं झालं...तो जी छोटी-छोटी कामे करायचा ती करणे आता त्याला जमेनात.त्याच्या चुलत्याला कोणीतरी कळवलं; मग त्याने त्याला गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये आणून ॲडमिट् केलं. येताना त्याच्या कपड्याची 'सॅक्' तेवढी सोबत आणली होती. आताही ती त्याच्या उशाला होतीच!! चुलता याला ॲडमिट् करुन जो तिथून गायब झाला; ते आज चार-पाच महिने झाले तरी इकडे फिरकलाही नाही की साधा चौकशीचा फोनही नाही..!! इथं आल्यावर त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या असता त्याला 'एड्स्'ही असल्याचे समजले होते . आईवडीलांअभावी पोरका जीव तारुण्याच्या उंबरठ्यावर भरकटला होता की जन्मतःच.....??; हे कळायला मार्ग नव्हता. आईवडील दोघाचंही नसणे आणि त्याचं 'वय' पाहता त्याला जन्मतः च 'ही' व्याधी असावी.
              इतकं दु:ख एकाच वेळी एकाच्याच वाट्याला आले की, देवाच्या 'देवत्वा'वरही शंका निर्माण होऊ लागते.. वार्डातल्या इतर पेशंटच्या सोबतीच्या बाया-माणसांनी त्या मुलाला प्रेमानं बोलता केल्यावर त्याने स्वत:ची 'ही' सगळी कहाणी सांगितली होती. मग त्याला तिथले सर्वजण काहींना काही खायला जेवायला द्यायचे...त्याची अवस्था बघून परकी माणसही आपल्या दु:खाला बाजूला ठेवून त्याच्यासाठी रडवेली व्हायची.पण रक्ताचा माणूस....'चुलता'!! तो इतका कसा निर्दयी, भावनाशुन्य होऊ शकतो??!!!!...स्वत:च्या सख्ख्या भावाच्या लेकराला असं वाऱ्यावर सोडून जाताना काहीच कसं वाटलं नसेल त्याला. त्याची जमीन लुबाडली आणि वर याला असं बेवारस टाकून गेला होता......
                त्या मुलाचं दु:ख पाहता इतरांप्रमाणे मलाही माझं दुःख काहीच वाटेना...'आपण जराशा दु:खाने,संकटाने किती व्यथीत होतो?, देवाला किती 'बोल' लावतो??!!' मग मी स्वार्थीमनाने कित्येकवेळा तरी देवाचे चक्क मनोमन आभार मानले; की त्याने मला धडधाकट, निरोगी शरीर,आणि चांगले कौटुंबिक आयुष्य दिल्याबद्दल !! पण त्याचं काय??!!! आता तर त्याच्या आयुष्याची सुरुवात होती. माझ्यापेक्षाही नऊ-दहा वर्षांनी तो लहान असेल नि हे असे दुर्धर व्याधींनी त्याला ग्रासलं होतं. परवा तो झोपेत खाटेवरुन कोसळला; मग त्याचा बिछाना नर्सने तोंड वेडेवाकडे करुन खालीच फरशीवर घातला व त्याला त्यावर झोपवला होता. आज पाच दिवस झाले त्याने अन्नपाणी सोडले होते. सकाळी कोण तरी ताटात काहीतरी खायला ठेवून जायचे पण ते दिवसभर तसेच रहायचे...आणि आताही तसंच होतं. कपड्यात केलेल्या मलमूत्र विसर्जनाने कोणीच त्याच्याकडे फिरकेनासे झाले होते...क्षणाक्षणाला त्याचे 'दु:ख' पाहून हळहळणारे, त्याच्या निष्ठूर चुलत्याच्या नावाने खडे फोडणारे नि अधुनमधून त्याला मदत करणारे आजूबाजूचे माणुसकीचे मुखवटे आपोआप गळून पडले ....नि लांबूनच पाहू लागले. जिथे रक्ताच्या माणसांनी पाठ फिरवली, तिथे बाकीच्यांच काय ...??
              तो पडल्या-पडल्या सतत काहीतरी पुटपुटायचा ....ते पाहून माझ्या मनात विचार चमकून गेला की, 'असं खुडंत-खुडंत जगण्यापेक्षा, देवाकडे तो स्वत:च्या 'दयामरणाची' याचना तर करत नसेल...??!!' आणि मलाही क्षणभरासाठी त्याच्यासाठी तेच योग्य वाटलं..... पण कोणाला मरावेसे वाटेल हो?! आणि वाटलंच तर तसं घडतंय थोडंच !!! रात्री तर थंडी खूप पडायची. अंगावर बेडशीट ओढून घ्यायचा त्याचा केविलवाणा प्रयत्न रात्रभर अधूनमधून चालूच असायचा; पण तो उघडाच पडायचा ....मनात विचार यायचा की जाऊन त्याला पांघरुण घालावं....पण तो विचार कृतीत उतरत नव्हता ...माझी मलाच लाज वाटू लागली...इतर वेळी 'माणूसकी'च्या नावानं 'ढिंडोरा' पिटणारा मी..!!!, नेमका गरजेच्यावेळी हतबल होत होतो....मग माणूसकीशीच तडजोड केली 'मनाने'.. मनातल्या मनात की, त्याला पांघरायचं जमत नाही ना तर, आपण पण रात्रभर पांघरूण घ्यायचं नाही ...आणि झोपलो तसाच उघडा ...मग कुठे थोडीशी मनातली खळबळ शांत झाली नि 'जर दु:खाची परिसीमा नि स्वस्थ जगण्याची आसक्ती पहायची असेल तर उघड्या डोळ्यांनी नि मनाने एखाद्या हॉस्पिटलमधून फेरफटका मारा म्हणजे तुम्हांला लाभलेल्या निखळ,निरोगी जीवनाची खरी किंमत कळेल' असं कुठल्या तरी पुस्तकात वाचलेलं वाक्य आठवलं ..नि त्याच विचारांच्या तंद्रीत झोप लागली.
       
               सकाळी जाग आली; तेव्हा माझ्या अंगावर चादर होती... ती माझ्या आईनेच अंगावर घातली होती.... पण कधी कोणास ठाऊक!? पण आज तिच्या त्या कृतीचा मला रागही आला, कारण तीच्यामुळे माझी मनाशी केलेली 'कमिट्मेंट' तुटली होती. यात आईचाही काय दोष म्हणा..!! कुठली आई आपला मुलगा कडाक्याच्या थंडीत उघडा पडला असता,शांत झोपेल?!!!! पण क्षणात मनाने उचल खाल्ली... जर त्या मुलाची आई असती त्याच्यासोबत तर.......मन खूप उदास झालं. त्याच्याकडे पाहिलं तर तो तसाच काहितरी पुटपुटत असलेला....
              दिवसभर वडिलांना पहायला आलेल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत, त्याचा विचार फारसा डोकावला नाही. रात्री जेवणाचा डबा घेऊन परत आल्यावर, मला त्या मुलाजवळ एक मुलगी बसलेली दिसली. दिसायला अत्यंत देखणी, पटियाला कुर्ती-धोती परिधान केलेली. मी आश्चर्याने तीच्याकडे पाहत पाहतच आईकडे डबा दिला. आईनेही लागलीच तीला ऐकू जाईल इतक्या आवाजात मला माहिती पुरवली ती अशी-
                   
                ती जी मुलगी होती, ती त्या मुलाची मावसबहिण होती. तो कामाला आटपाडीत आहे, एवढंच तीला माहित होतं. गेल्या पाच-सहा वर्षांत एकमेकांची भेटही झाली नव्हती. तीचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं; पण लग्नालाही तो आला नव्हता. आताही तो इतका आजारी असल्याचं कुणाकडून तरी तीच्या कानावर आलं होतं पण कुठल्या दवाखान्यात? हे मात्र समजलं नव्हतं. मग ही त्याच्या चुलत्याला जाऊन भेटली. चुलत्यानं तीला पत्ता दिला खरा....पण "तु हे नसतं 'लोडणं' गळ्यात अडकवून घेऊ नकोस..तुला तुझा संसार बघायचा आहे नि तसा ही तो फार काळ तग धरंल असंही वाटत नाही ....तेव्हा तू कशाला जातेय? शहाणी असशील तर जा ....निवांत सुखानं रहा जा.. कशाला सुखाच्या गांडीला,दु:खाचा बिब्बा लावून घीतीया !!? " असं म्हणाला. तिनं मग त्याच्या जमीनीच्या पैशांचा विषय काढला; तर "समदं पैसं दिल्यात हिसाबा परमाणं...!! उलट माझंच पैसं गेलं त्याच्या दवादारुवर.., आता माझ्याच्यानं जमंना म्हणून तर टाकला सिव्हिलला..."असं एकदम कारवादून निरवा-नीरवीचं बोलला. ती काय समजायचं ते समजली आणि नवऱ्याला मिनतवाऱ्या करुन आज भेटायला आली होती भावाला .....
                ती रडत-रडतच त्याच्या कानाजवळ वाकून बोलत होती....नि बहिणीचा इतक्या वर्षांनी आवाज ऐकून त्या बिचाऱ्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या बेवारस, ओंगळवाण्या पेशंट बरोबर ही कोण मुलगी एवढ्या आपुलकीने बोलतेय ? आणि असेलच कोण जिव्हाळ्याची तरी आजच कशी उगवली ? आणि इतक्या जवळ जाऊन कशी काय बोलतेय??! याचंच आश्चर्य सर्वांच्या नजरेत दिसत होतं.
              त्याच्या कपड्यांची अवस्था बघून तीने मनात काहितरी ठरवलं नि ती शोधक नजरेने इकडे-तिकडे बघत होती; मी मनात ताडलं की ती काय शोधतेय..?!! मी तीला त्याची 'सॅक' दाखवली. मग तीने त्यातून त्याचा शर्ट व बर्मूडा काढला..व ती त्याचे कपडे बदलण्यासाठी त्याच्याजवळ गेली. तेवढ्यात रिसेपशन काऊंटरवर बसून सर्वांना 'हे हॉस्पिटल आहे सावकाश बोलत जा 'असे वारंवार बजावणारी नर्स आता मोबाईलवर 'कैंडी क्रश्' खेळता-खेळता लांबूनच ओरडली,-. "कपडे बदलताय का?" त्या मुलीने मान डोलावली. मोबाईल वर नजर ठेवतच म्हणाली, "मग हातात 'हॅन्डग्लोव्हज्' घाला." नर्सचं बोलणं ऐकून ती काही क्षण तशीच शुन्यात नजर लावून बसली...
           
              काय वाटलं असेल त्या बिचारीला..?? ज्याच्या हाताला कधीकाळी प्रेमानं राखी बांधली, त्या 'पाठिराख्या'भावाला आता साधा स्पर्शही करता येऊ नये..... ??!!! ती नाईलाजास्तव मनाविरुध्द जावेसे लागल्यासारखे अडखळतच नर्सपुढे जाऊन उभी राहिली तशी अगोदरच योजून ठेवल्याप्रमाणे नर्स पटकन म्हणाली, "हॅन्ड ग्लोव्हज् नाहीत,बाहेरुन आणावे लागतील !!" आणि परत कैंडी क्रश खेळण्यात गढून गेली. ती काहीशी गोंधळली व परत त्या मुलाजवळ येऊन उभी राहिली..त्या नर्सचा मला प्रचंड राग आला,पण.....
             ती विचारात पडली असता, आमच्याकडे 'ग्लोव्हज'चा व 'ॲडल्ट पॅम्पर'चा बॉक्स जसाच्या तसाच पडला होता; कारण माझे वडील कोमात गेलेले..... मी आईला सांगून तीला ते द्यायला लावले. ती त्याचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न करु लागली, पण तीला ते एकटीला जमेना.. आता तीची नजर इकडे-तिकडे तीच्या नवऱ्याला शोधू लागली;पण नवरा तिला तिथे सोडून कधीच गायब झाला होता.. बहुतेक त्यालाही मेव्हण्याच्या जवळ जायला भिती वाटत असेल..‌..... माझी आई तेव्हा शेजारच्या एका बाईला दबक्या आवाजात सांगत होती..."बघा की बाई.!! हीचा नवरा आलाय, पण तो जाऊन लपून बसलाय बाहेर जाऊन ...ही एकटी पोरगी ! कशी बदलणार त्याचे कपडे??! बरं ..ती महामाया(नर्स) तर मदतीला येतेय का बघा?!..बसलीय मोबाईल चापचत...!!"
         
            मी लगेच पिशवीतीले ग्लोव्हज् काढून हातात घालू लागलो,तर शेजारची बाई आईला माझ्याकडे पाहत खुणावत होती....मी तीचं म्हणनं ओळखले‌ व आईला समजावलं "समज त्या मुलाच्या जागी आपल्यातलंच कोण तर असतं तर.....??" यावर आई काहीच बोलली नाही. त्यावेळी अचानक माझ्या हातातील ग्लोव्हज् पाठिमागून कोणी तरी जवळ जवळ खेचूनच घेतले. मी वळुन पाहिले तर ते माझे 'दाजी' होते...चंदूदाजी!! ते असे का करतायत हे विचारु पर्यंत त्यांनी स्वत:च्या हातावर ग्लोव्हज् चढवले व ते त्या मुलीला मदत करायला गेलेसुध्दा...!!
            
             दाजी व ती मुलगी, दोघे मिळून त्या मुलाचे कपडे बदलत असताना मनात अनेक विचार उचंबळून येऊ लागले... 'त्याअभागी मुलाचा दुर्धर आजार , ओंगळवाणा अवतार पाहून त्याचा लपून बसणारा दाजी कुठे नि त्या मुलाचे कपडे बदलताना, जर झालाच काही त्रास तर ...तो मला होऊ दे पण माझ्या मेव्हण्याला नको.. असा विचार करुन पुढे सरसावणारे माझे दाजी कुठे!!???' ,जीचं खरं ते काम होते ती बया मोबाईलमध्ये गुंग होती.....बाकीचे बघे मात्र त्यांची भूमिका चोख बजावत होते. मला माझ्या चंदूदाजींचा खूप अभिमान वाटला. माझ्या दाजींनी त्याचे पॅम्पर बदलले ...त्या मुलीने ओल्या फडक्याने त्याचे अंग पुसून घेतलं. कपडे बदलून झाल्यावर मात्र त्या मुलीचा नवरा चमत्कार झाल्यासारखा अवतरला...त्यावेळी तीचे 'असाह्य' डोळे क्षणभर निखाऱ्यासारखे भासले....तो अपमानित नजरेने तीच्याशी काहीतरी जुजबी बोलला...व ते दोघे त्या मुलासाठी काहीतरी खायला आणायला तिथून बाहेर पडले....
               
              ते जाताच ती नर्स उठून चक्क आमच्या जवळ आली (म्हणजे तीचे आमच्याकडेच लक्ष होतं व जणू त्यांच्या बाहेर जाण्याचीच वाट पाहत होती..)आणि म्हणाली,"तुम्ही कशाला मदत करायला गेलात?....तीचा नवरा होता, पण तो आला का मदतीला..??...या लोकांना सवयच लागते मग दुसऱ्यांकडून मदत घेण्याची... यांची नातेवाईक म्हणून काय जबाबदारी आहे की नाही??! आज पाच सहा महिन्यांनी उगवलेत ते..! आम्हांला काय एकच पेशंट बघायचा असतो काय?? आता बघा..!! गेले की परत पाच-सहा महिन्यांनीच अवतरणार !"  ते ऐकून मी तीच्याकडे फक्त एक जळजळीत कटाक्ष टाकला; तसा तीने तिथून काढता पाय घेतला....माझ्यात एवढं 'धारिष्ट' कुठून आलं देव जाणे!!! त्या मुलाच्या चेहऱ्यावर आता थोडीशी 'तरतरी' दिसत होती नि तो आपल्या लाडक्या बहिणीला 'आक्का आक्का' अशा हाका मारत होता...
               
                थोड्या वेळाने त्याची बहिण व दाजी परत आले. ती आपल्या भावाला 'नारळपाणी' पाजत होती तर, तीचा नवरा तिथेच जवळ उभा होता. बहुतेक बाहेर गेल्यावर तीने त्याला चांगलंच सुनावले असावे....मग ती त्या नर्सला जाऊन भेटली. तिला आपली सासरकडची असाह्यता समजावली व काळजावर दगड ठेऊन म्हणाली की," मी अशा अवस्थेत जरी त्याला घेऊ जाऊ शकत नसली तरी, त्याला वरचे वर भेटायला येत जाईन ...मला खरंच तो इथं ॲडमिट् आहे हे माहित नव्हते.. जर त्याचं काही बरंवाईट झालं तर या नंबर वर आठवणीने फोन करून कळवा, बेवारस म्हणून विल्हेवाट लावू नका...मी घेऊन जाईन ...!! " ती एवढं बोलली व रडत रडत आपल्या भावाला परत येण्याचं कबूल करुन त्याचा निरोप घेऊन निघून गेली.
          काय अवस्था झाली असेल त्या अभागी भावा-बहिणीची??? आपण फक्त कल्पनाच करु शकतो .....पण तरीही तीच्या भेटीने, गेले सहा महिने 'बेवारस' म्हणून जगणारा पेशंट आज 'वारसवाला' झाला होता. आणि शांत झोपी गेला होता. जीवंत माणसाला प्रेमाच्या चार शब्दांची ,आधाराची गरज असताना कोणी पुढं येत नाही अगर येऊ दिलं जातं नाही; पण तो संपल्यावर मात्र गरज नसतानाही त्याच्या 'अंत्यविधी'चा भार उचलतात ...कारण 'निप्राण जीवा'साठी काहीजरी केले तरी शून्यचं की!!! किती विचित्र आहेत ना... आपल्या माणसूकीच्या संकल्पना ??!!
        हीएक सत्य घटना आहे...आजही तो अभागी मुलगा त्या हॉस्पिटलमध्ये वार्ड नं.६२ मध्ये आपल्या बहिणीच्या भेटीची वाट पहात आहे....आणि नाईलाजाने त्याचे इतके हालहाल होण्यापेक्षा आणि ते बघण्यापेक्षा.. दिलेल्या फोन नंबरवर हॉस्पिटलमधून येणाऱ्या फोनचीच वाट पहात असेल कदाचित, त्याची एकमेव लाडकी, अभागी बहीण!!
                             !!!थोडंस मनातलं!! 
       आपल्या प्रतिक्रिया नाही दिल्या तरी चालतील....पण कुठे गरज असेल तिथे आपल्या परीने मदत करा आणि करत असालच तर इतरांनीही ते करावं म्हणून त्यांना ही कथा शेयर करायला विसरु नका ... धन्यवाद!!!


Comments

Post a Comment

Popular Posts