मी होतो शिपाई !

        कॉलेजमध्ये खूप उत्साह ओसंडून वाहत होता. जिथे-तिथे मुलं-मुली आपापल्या घोळक्यांसोबत उभी होती . गप्पांना ऊत आला होता..आणि त्याला कारणही तसचं होतं ; उद्या 'विद्यार्थीदिन' होता!! त्यामुळे सगळे त्याविषयीच चर्चा करत होते..तर कोणी ती चर्चा ऐकून त्यांचीच टर उडवत होते.‌तसं प्रत्येक कॉलेजमध्ये असं एक 'टोळकं' असतंच!! सर्व मुली - शाल्मली,रेश्मा,श्वेता,पल्लवी आणि नेहमी आपल्या सौंदर्यावर भलताच अभिमान म्हणण्यापेक्षा गर्व असणाऱ्या प्रतिक्षा व वर्षा या सर्वही भलत्याच खुष होत्या. कॉलेजमध्ये ही 'जोडगोळी' विविध नावांनी फेमस होती - कोण त्यांना 'डबल बार' म्हणत तर कोण 'फटाकड्या'!! असो...तर यासर्वांमध्ये उद्या कोण कुठली नेलपॉलिश लावणार ते कोण, कोणत्या रंगाची साडी नेसणार ? ; कोण कोणती हेअर स्टाईल करणार?; कुठला परफ्यूम मारणार?, चप्पल की सैंडल?, पर्स की डिसेंट जीन्स शबनम ? इथंपर्यंत हजार प्रश्नांवर चिवचिवाट सुरु होता!!..... तर मुलांमध्येही अशाच ढंगाची पण पोरींची सर येईल इतकी तीव्र नसणारी, हलकीफुलकी तयारीविषयक चर्चा रंगली होती. अविनाश , प्रमोद , श्रवण, राहुल, अशोक, मोहन ,मंदार अशी किती तरी मुलं नेहमीप्रमाणे चर्चेत अग्रभागी होते. इतक्यात कॉलेजची बेल झाली आणि सगळेजण पटापट प्रार्थना हॉलमध्ये पळाले........!

        शिपाई गंगाराम काकांनी हॉस्टेलमध्ये एक चक्कर मारली; कारण त्यावेळी प्रार्थना चुकवून हॉस्टेलवरच थांबून नंतर डायरेक्ट वर्गात जाणं म्हणजे खूप मोठा पराक्रम वाटायचा. कोण कोण अधेमधे असे करायचे आणि त्यांचा पराक्रम पचायचा ही !! पण कधी कधी असले फालतू उद्योग (अर्थातच सर व इतर हुशार मुलां-मुलींच्या दृष्टिने......) लक्षात यायचे आणि मग त्याला शिक्षा केली जायची...दोन दिवस मुलांचे टॉयलेट धुवायचे, झाडांना पाणी घालायचे,भल्या पहाटे उठून विहीरीवर मोटर चालू करायला जाणे अशा ...थोडक्यात काय 'कॉलेज' मोठं शिस्तचं होतं!! गंगाराम काकांनी हॉस्टेलला कुलपं लावुन चावी ऑफिसात आणुन ठेवे पर्यंत इकडे परीपाठ संपला होता. प्राचार्यांनी धीरगंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली - "उद्या , विद्यार्थीदिन आहे तेव्हा सालाबादप्रमाणे उद्याचं अध्यापन कार्य तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पार पाडायचे आहे, कोण कोण सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपापल्या क्लास टिचर्स कडे विषयवार नावं द्यावित". 

        सगळेजण आपापल्या वर्गात गेले. सर्वांचं अगोदरच ठरलं होतं. त्यामुळे गायकवाड सर वर्गात आल्या-आल्या इच्छूकांनी विषयावर नावे दिली. गणित, इंग्रजी, व विज्ञान असे विषय हुशार मुलां-मुलींनी घेतले. इतिहास,भूगोल, हिंदी, मराठी विषयही अनेकांनी शिकवायला सोपे अशा गैरसमजूतीने म्हणा.... पण घेतले खरे!! ज्यांना मनाजोगता विषय मिळाला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला; सगळेजण आतापासूनच एकमेकांना मैडम- सर म्हणून हाका मारु लागले. पाठीमागं बसून नेहमी टवाळक्या करणारी पोरं तर मुद्दामहून चिडवू लागली. गायकवाड सरांनी अचानक सर्वांना शांत रहायला सांगितलं आणि वर्ग शांत झाला. सर काय सांगताहेत इकडे सर्वाचं लक्ष लागले. 

          सर म्हणाले, " अरे अध्यापनाचं झाले , पण एक महत्त्वाचा मुद्दा राहिलाच की!!". सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह निरखीत सर पुढे म्हणाले, "अरे आपला 'शिपाई' नेमायचा राहीलाच की!!" त्या सरशी प्रतिक्षा व वर्षा एकदमच म्हणाल्या अय्या हो की!! तसं मागच्या टोळक्यातलं कोणतर ओरडलं - "अय्या इश् खरंच की!!" आणि अचानक वर्गात हास्यांची ढगफुटीच झाली. वर्षाने मानेला झटका देऊन मागे पाहिले तसं मागची टाळकी चिडीचुप झाली आणि तीने जशी परत समोर मान वळवली तसे हम्म्ममम् ऽऽऽ चा आवाज पाठोपाठ घुमला ......परत हास्यात वर्ग न्हाऊन गेला. सरांनी कसंबसं वर्गाला शांत करत विचारले ,सांगा कोण होणार 'शिपाई'!!??? तर जे-ते एकमेकांकडे पाहू लागले. ज्यांनी अद्याप कशातच भाग घेतला नाही त्यांना विचारले पण कोणी 'नाव' द्यायचं सोडा, पण वर बघायलाही तयार होईनात....!अगदी मागच्या 'टोळक्या'तलेही!! त्यांची ती अवस्था बघून सगळ्या मुलींना चेव आला.त्या मुलांकडं बघून फिदीफिदी हसू लागल्या आणि मुलं खाली 'लादी' आहे हे माहित असूनही पायाच्या अंगठ्याने उगीचंच ती उकरण्याचा चाळा करु लागले......


            पण कोणीच तयार होईना.... जो-तो एकमेकांवर ढकलू लागला. सरांनी खूप समजावलं तरीही....आणि अचानक शेवटच्या बाकावरुन एक आवाज आला ......"सर, मी होतोय शिपाई!!" आणि अख्खा वर्ग त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागला ...तो आवाज होता प्रतिकचा! हो प्रतिक शिवाजी लोहार!! हा प्रतिक मागच्या टोळक्यात बसायचा खरा... पण कधी कोणाची टिंगलटवाळी नाही की कोणाशी मनमोकळं बोलणं नाही...पण कोणी 'जोक्' केला तर हसायचा मात्र दिलखुलास !.... आणि आज सगळा वर्ग 'शिपाई होणार का?' या प्रश्नावर निरुत्तर झाला असता, भलेभले आगाऊपणा करणारेही मूग गिळून गप्प बसलेत नि 'हा' अचानक उठून म्हणतोय, मी होतो शिपाई !!....याचंच सर्वांना निमिषभर आश्चर्य वाटलं खरं ,पण लगेचंच कोणी तरी ओरडलं "चला' शिपाईकाका सापडले !" तसे वर्गात पुन्हा एकदा हास्यांची ढगफुटी झाली .....पण प्रतिक निश्चल उभा होता,चेहऱ्यावर स्मित हास्य आणत… मोठ्या आत्मविश्वासानं तो सर्वांकडे बघत होता; जो आजपर्यंत कधी इतका प्रकर्षाने त्याच्या डोळ्यात दिसला नव्हता....आज त्याचा चेहरा वेगळंच काही तरी सांगत होता.

        लगेच उद्याचे सर-मैडम "शिपाई काका, उद्या चांगली सर्व्हिस द्यायचीही हं !! असे म्हणून प्रतिकला चिडवू लागले.....प्रतिकने ही त्यांना हसून संमती दिली. तोपर्यंत पहिला तास संपला होता...सर वर्गातून वाजत्या 'बेल'ची आज्ञा मानून पटकन निघून गेले. प्रतिक्षा त्याचवेळी मागे वळून प्रतिकला म्हणाली , "तुला कॉफी बनवता येते ना ?? मला तर बाई कॉफीच लागते." तसं दिवसभर सगळ्यांनीच आपापली चॉईस् सांगून त्याला भंडावून सोडलं. प्रतिकच्या जवळच्या मित्रांनी त्याला 'नसती आफत ओढवून घेतलीस तू , उद्या बघ तुझी खेचतील सगळे' असे सांगितले. पण प्रतिक शांतपणे दिवसभर नुसता स्मितहास्य करत होता...

           दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये नुसते हास्याचे फवारे तर कधी मध्येच गाणी - अंताक्षरींचे आवाज, तर कधी वाद-संवाद सुरू होते. संबंध कॉलेजमध्ये 'उधान'आल्यासारखे झाले होते. काही कामानिमित्त म्हणा किंवा निरोप देण्यासाठी म्हणा प्रतिकला वर्गात यावं लागायचं. प्रतिकने आज जुनाच पण स्वच्छ इस्त्री केलेला पांढरा शर्ट व निळी पॅन्ट घातली होती. तो प्रत्येक काम अगदी हसतमुखाने करत होता. सगळे जण त्याच्याकडे पाहून हसत ..कोणी उगीचच दुसऱ्याच्या कानात कुजबुजत... मधल्या सुट्टीत काही विद्यार्थ्यीशिक्षकांनाही त्याची चेष्टा करण्याची लहर आली.... प्रतिक्षा व वर्षाने त्याला कॉफी बनवण्याची ऑर्डर दिली व इतरांनी त्यांना साथच दिली...देखण्या मुलीच्या मताला खोडून काढून कोण स्वत:च्याच पायावर धोंडा मारुन घेईल...... !!! प्रतिकनेही निमूटपणे कॉफी बनवली ; ती पिताना मात्र सर्वांनी त्याचं कौतुक केलं....... "पण याचं 'श्रेय' प्रतिक्षालाच हं !" असं पटकन वर्षा म्हणाली ; सगळ्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या..प्रतिक्षा व वर्षाने टाळ्या दिल्यावर तर पोरांच्या हाताला गुदगुल्याच झाल्या......!! दिवसभर नेहमीच्या सगळ्या सर व मॅडम् ना ऑफीसमध्ये बसून निवांत गप्पा मारता येत होत्या ; म्हणून ते पण खुष होते. शिपाई गंगाराम काका तर आंब्याच्या झाडाखाली बसून रेडिओवर आपली आवडती गाणी ऐकत होते. एकदम खेळीमेळीच्या वातावरणात वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. 

           शेवटच्या तासाला सर्वांना व्हरांड्यात बसवलं गेले. प्राचार्य, सर्व टीचर्स व्यासपिठावर बसले होते... 'विद्यार्थीदिना'ला दिवसभर आलेल्या अनुभूतीवर प्रत्येकाने आपापले मत व्यक्त करायचे होतं. सर्वांनी आपापल्या अनुभवाचं कथन केलं; पण त्यात कोणी प्रतिकच्या नावाचा कुणी साधा उल्लेखही केला नाही.....सर्वात शेवटी प्रतिक बोलायला उभा राहिला आणि सगळी मुलं शिपाई काका आले म्हणून कुजबुजू लागले......

        प्रतिकने एक मोठा दीर्घश्वास घेतला आणि त्यानं बोलायला सुरुवात केली - मी आपला खूप खूप आभारी आहे, मला शिपाई बनण्याची संधी मिळाली..आणि ती मला आपल्या सर्वांमुळे मिळाली; कारण इतर कोणी 'शिपाई' बनण्याची तयारी दर्शवली नाही म्हणूनच हे शक्य झाले.....म्हणूनच तुम्हां सर्वांचे आभार!!" सर्वांना हा वेगळंच काय तरी बोलतोय, याचं आश्चर्य वाटत होतं तर दुसऱ्या बाजूला काहीसं हसूही...म्हणे आम्ही संधी दिली.... शिपाई बनण्यात कसला आलाय मोठेपणा!!??? कोणीतरी म्हटलं आहेच ' स्वप्न पूर्ण होवोत अगर न होवोत पण स्वप्न मोठीच पहा' आणि हा वेडा शिपाई बनण्यास संधी दिली म्हणून आमचे आभार मानतोय...खरं तर आम्ही 'संधी' दिलीच नाही उलट नकार दिला आणि नसत्या नाचक्कीस पूर्णविराम दिला. काहि जणांना असंही वाटुन गेलं की हा सर्वांची सहानुभूती मिळवण्यासाठी असं बोलतोय.....सर्वांच्या उत्सुकतेला चिरत प्रतिकचा आवाज आला... "कारण मी एका शिपायाचा मुलगा आहे!! माझे वडील पं.समितीमध्ये 'शिपाई' होते.वडिलांच्या घरची परिस्थिती एकदम हालाखीची होती, त्यांना लहानपणी अचानक पॅरालिसीसचा तीव्र 'ॲटॅक' आला आणि त्या़ंच्या शरीराची डावीबाजू ६०टक्के निकामी झाली. पण वडिलांनी आपलं सातवी पर्यंतचं शिक्षण मोठ्या हिमतीने पूर्ण केलं व नशीबाने त्यांना अपंगाच्या कोठ्यातून शिपायाची नोकरी लागली. त्यांचं लग्न झालं ; पुढे माझ्यासह दोन मुलं व एक धाकटी मुलगी झाली. तीन मुलांचं पालनपोषण,शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलं ...पण आम्हाला कधी कमतरतेची झळ पोहोचू दिली नाही. पण येवढ्यावरच समाधान मानेल ते दुर्दैव कसले!! माझ्या वडिलांचीच शारीरिक हालचाल मंदावलीच होती आणि त्यात भर म्हणून त्यांना ऐकायला कमी येवू लागले....लहानपणी आलेल्या अटॅकचेच दुष्फळ असल्याचे निदान झाले. त्यामुळे वडिलांना ऑफिसमध्ये काम करताना अनेक अडचणी येवू लागल्या....कधी चूका झाल्या किंवा काम करण्यास उशीर झाला तर काही साहेब लोक ओरडायचे. साहेब म्हणजे बहुतांश कारकुनच.!! पण त्यांची पोस्ट वडिलांपेक्षा मोठीच ना!?? मी ही लहान असताना कधी कधी वडिलांबरोबर हट्ट करुन जायचो...पण बाबा कधी कोणाला उलट बोलत नसत, कोणी चेष्टा केली तर फक्त त्यांच्याकडे पाहुन हसायचे ...अगदी तसंच जसं मी आज तुम्हांकडे बघून हसलो दिवसभर.!!" हे वाक्य ऐकलं नि सगळीकडं स्मशान शांतता पसरली, सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या..काहि मुला-मुलींना तर अश्रू थोपवून धरणं अवघड झालं आणि त्यांच्या माना आपसूकच खाली झाल्या.....! प्रतिक पुढे बोलू लागला, " मी बाबांची ही परवड अनेकदा पाहिली असल्याने सातवी-आठवीपासून मी मोठ्या जिद्दीने अभ्यास करु लागलो...बाबांच्या ऑफिसात दहावीला चांगले मार्कस् मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांमुलींचा सत्कार -गुणगौरव करण्याची पध्दत फार पूर्वी पासून चालत आलेली होती...बाबांचं कसबसं काम करणं चालूच होतं आणि घरात आई अपुरेपणातलं 'पुरेपण' जपण्याचा प्रयत्न करीत होती.." आता मात्र व्हरांड्यातले सगळे कानात जीव आणून प्रतिकचा शब्दन् शब्द ऐकत होते.. ज्यांनी प्रतिकची मस्करी केली होती त्यांच्या तर चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव दिसत होते!


          "याच गतीने दिवसही पुढे सरत होते नि मी दहावीत गेलो. मी दहावीत गेल्यानंतर मला अचानक एकदिवस पहाटे 'स्वप्न' पडलं - त्यात माझा बाबांच्या ऑफिसात सत्कार केला जातोय असं ते स्वप्न होतं... मी सकाळी उठून कोणालाही काहीच बोललो नाही...कारण पडलेली स्वप्न दुसऱ्यांना सांगितली की ती पूर्ण होत नाहीत ( फक्त चांगलीच); आणि पहाटेची स्वप्न खरी होतातच म्हणे ! म्हणून मी ब्र शब्दही नाही काढला.उठता-बसता मला ते सारखं स्वप्नच आठवायचं आणि मी त्याच तिरमिरीत कधी कधी निम्म्या रात्री उठून पुस्तक वाचायला बसायचो. बरोबरच्या मुलां-मुली़ंचे आई-वडील मुलांना ट्युशनला जु़ंपुनही शाळेत तक्रार करत यायचे की आमची मुलं अभ्यासच करीत नाहीत आणि माझ्या घरचे अगदी उलटेच, मला म्हणायचे,' लई पुस्तकं वाचू नको येडा हुशील'...मग मला त्यांचा खूप राग यायचा कारण मलाही वाटायचे की माझ्याही आई-वडिलांनी माझ्या अभ्यासाची तक्रार घेऊन शाळेत यावं...पण असं कधीच झालं नाही. मन पार खट्टू होऊन जायचं पण लगेच ते स्वप्न मला आठवायचं नि मी परत अभ्यासाला लागायचो."


            "दहावी वा.परीक्षेचा निकाल लागला व मला ८२% मार्क्स मिळाले ; आणि मला पडलेलं स्वप्न खरं झालं. बाबांच्या ऑफिसच्या जाहिर कार्यक्रमात माझा व माझ्या आईवडीलांचा गुणगौरव करण्यात आला. त्यावर्षी इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना माझ्याइतके मार्क्स मिळाले नव्हते. 'यश' तर चांगलंच मिळालं होतं पण त्यापेक्षाही एका सामान्य शिपायाच्या मुलांनं ते मिळवावं आणि तेही विना ट्यूशन , याच गोष्टीचं सर्वांना अधिक आश्चर्य वाटत होतं. जे बाबांना टोचून बोलायचे तेच आता माझ्या बाबांचं अभिनंदन करत होते. रस्त्यानं जाणारे येणारे ,अगदी कधीही न बोलणारे ही बाबांशी आवर्जुन बोलत होते ; नि माझ्या बाबांना तर शब्दच फुटत नव्हते...रात्री बाबा आईशी एकच वाक्य परत परत बोलत - "पोरानं माझी मान उंचावली !" त्यादिवसापासून माझ्या बाबांशी त्यांच्या ऑफिसातले सगळेजण अदबीने बोलू लागले...काहिंनी तर स्वत: हून सांगितले की, पोरगं हुशार आहे चांगलं शिकव आणि काही लागलं तर नक्की सांग."

           "आज जो मी इथं उभा आहे ते केवळ माझ्या बाबांमुळे! त्यांनी हे सगळं साध्य केलं ते त्या 'so called' साध्या शिपायाच्या नोकरीमुळेच! त्यांनीच जर त्यांच्या कामाबाबत लाज बाळगली असती तर......??? नुसती कल्पना करुन पहा ,काय झालं असतं?? आणि बाबांची कामाच्या प्रति निष्ठा मी लहानपणापासून बघत आलो असताना, मी शिपाई होण्यासाठी तयार झालो नसतोच तर नवलच!! सुरुवातीला माझ्याही मनात लाज डोकावलीच पण क्षणभरंच.. क्षणात मला माझ्या बाबांची तळमळ डोळ्यापुढे उभी राहिली आणि माझ्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले "मी होतो शिपाई". मुळात म्हणजे कोणतंही काम हलकं नसतं हलकी असते ती आपली 'विचारसरणी'! मी पुढं कोण होईल ते माहित नाही पण आज बाबांचं जीवन एकदिवसासाठी का होईना मला जगायला मिळालं हेच खूप काही आहे माझ्यासाठी....ते तुम्हां सर्वांमुळे साध्य म्हणून तुमचे आभार ...!"
            - एवढं बोलून तो भरल्या डोळ्यांनी हसत हसत खाली बसला..आणि अचानक शिपाई गंगाराम काका धावतच प्रतिकच्या जवळ गेले आणि त्यांनी प्रतिकला कडकडून मिठी मारली......आणि व्हरांड्यातली स्मशान शांततेची जागा सर्वांच्या 'मुसमुसण्याने' घेतली...........!!

Comments

Popular Posts