ऋण !

        दुपारचा दीड वाजून गेला होता आणि कंपनीतले कामगार आपापल्या ग्रुपमध्ये जेवायला बसले होते. हसत-खेळत जेवण चालले होते. पण आज आनंदचं लक्ष जेवणावर नव्हतंच मुळी ! शुन्यात नजर लावून तो कसल्यातरी विचारात होता. त्याला एक-दोघांनी हटकलंही पण तो तेवढ्यापुरतं जेवत असल्याचं दाखवायचा. पण 'आज त्याचं काहीतरी नक्की बिनसलंय',ही गोष्ट त्याच्यासोबतच नेहमी काम करणाऱ्या प्रदिपच्या लक्षात आली. सगळेजण डबा धुवायला नळावर पांगल्यावर प्रदिप त्याच्या जवळच येऊन बसत म्हणाला, " अरे आनंद ! कधीचा जेवतोयस!!? आवर पटकन ... आणि आज लक्ष कुठं आहे, महाराज!? घरी काय वाजलं की काय वहिनींसोबत?? " त्याच्या प्रश्नानं आनंद काहीसा गडबडून जात पटकन म्हणाला, " नाही रे...! कुठं काय....? असंच....". मोठ्यानं हसत प्रदिप म्हणाला," नाही कसं..! ? सकाळपासून बघतोय, आज जरा तू शांत शांतच वाटत होतास ....त्यात थोड्यावेळापूर्वी तुला फोन आल्यापासून तर पारच धांदरुन गेलायस..घरी काय झालंय का? आणि तो फोन कुणाचा आला होता....?, बघ...आतल्या आत कुढत राहण्यापेक्षा कुणाजवळ तर मन हलकं करायचं रे....बरं असतं ..तुला मला सांगायचं नसेल तर नको सांगू ...पण कुणाशी तरी बोल.. बोलल्याशिवाय कसं कळणार ..काय प्रॉब्लेम आहे ते?!!" प्रदिपच्या या बोलण्यानं आनंदला मग बोलणं भाग पडलं ....." अरे काय सांगू !!?....आपलं 'काम' हे असं ! ...ओव्हर टाईम धरुन महिन्याला हातात येतात सात हजार ! त्यात महिन्याची बाबांची औषधं,पोरीचं शिक्षण,महिन्याचा घरखर्च यातच पैसा कुठं जातो कळत नाही.... गेल्यावर्षी आई गेली, तेव्हा बचतगटाचे बारा हजार कर्ज झालंय डोक्यावर !.... ते अजून फेडले नाही. मग कुणाकडून तरी दर महिन्याला काहींना काही हातउसने पैसे घेऊन कसंबसं दिवस ढकलायचे चाललेय‌.....त्यात आता चार दिवस झालं बायकोने डोकं खाल्लेय...!" - "अरे सगळ्यांच्या बायका अशाच ....नवऱ्याचं डोकं खाण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो...हॅ..हॅ.हॅ.. तरी बरं माझ्यावर अजून ते दिवस आले नाहीत!" स्वत:च केलेल्या जोक वर स्वत:च हसत प्रदिप पुढे म्हणाला, "बरं... पुढं बोल ...वहिनीचं काय?" - " अरे उद्या वटपौर्णिमा आहे ना ! तर आमच्या बाईसाहेबांना साडी पाहिजे.." - "मग त्यात काय एवढी ताण घ्यायची गोष्ट..!!? घ्यायची की मग एखादी..एकुलती एक बायको...!!" डोळे मिचकावत प्रदिप बोलला. - "अरे ऐक तर ....तीला चार-पाचशेची साधी साडी नकोय.....एकवीशे रुपयांची 'सेमी पेशवाई' साडीच पाहिजे... ओरिजनल पेशवाई म्हणे आठ हजारांपासून पुढे आहेत....‌ आमच्या चाळीत खालच्या मजल्यावर नवीन भाडेकरू आलाय रहायला...सव्वाशे ! त्यानं आणलीय त्याच्या बायकोसाठी ....मग आता तसलीच साडी तुझ्या वहिनीला पाहिजे ....मी समजवलं खूप; पण ऐकायलाच तयार नाही. चार दिवस झालं रुसून बसलीय...बोलणंच टाकलंय..आज सकाळी येताना परत वाजलं, म्हणतेय साडी आणली तरच वड पूजायला जाणार नाही तर नाही... ....मगाशीच बाबांचा फोन आला होता ...मी सकाळी घरातून बाहेर पडल्यावर, पोरीला शाळेत धाडून ही जी आतल्या खोलीत जाऊन बसलीय ती बाहेरच आली नाही अजून...! बाबांना जेवणानंतर वेळेवर गोळ्या खायच्या असतात... बाबांनी ती बाहेर यायची खूप वाट पाहिली...शेवटी स्वत: हातांनी जेवण घेऊन खाल्लं तरी ही 'बया' बाहेर पडेना ....बाबांच्या जीवलग बालमित्राचीच मुलगी ! ....न राहवून बाबांनीच तीला 'जेवण कर' म्हणून बाहेरुन हाका मारल्या तर आतूनच म्हणाली,"मला भूक नाही." शेवटी नाईलाजाने बाबांनी मला फोन केला , आणि मी आता फोन करतोय तर उचलत पण नाही ती ! ..... सांग, आता मी काय करू...??!!"

           हे सगळं ऐकून प्रदिप शांत झाला....मग आनंदच पुढे म्हणाला," बघ तू नुसता ऐकूनच निरुत्तर झालास ना !! तु खरंच सुखात आहेस ....नको रे बाबा या लग्नाच्या झमेल्यात पडू.....आयला !! मरमर मरायचं, मन मारायचं ..!! कुणासाठी ?? यांच्यासाठीच ना..!!? मग सगळं डोळ्यासमोर दिसत असूनही असं वागायचं म्हणजे काय..!?! एवढंच वाटत होतं तर एखादा पैसेवालाच बघायचा होता ना....!!" ..... कधीच कुणाशी आपलं वैयक्तिक आयुष्य 'शेयर' न करणाऱ्या आनंदच्या भावनांचा आज प्रदिपच्या आपुलकीच्या दोन शब्दांनी बांध फुटला होता.....एव्हाना सगळयांनी परत कामाला सुरुवात केली होती . प्रदिपने जवळ येत त्याच्या खांद्यावर हात टाकला व म्हणाला, " तू टेंशन घेऊ नको...शांत हो...आपण काही तरी मार्ग काढू...पण आता आवरुन पटकन फॉऊंड्रीत ये.....दिवाणजी बोंबलत असेल.." व तो पटकन कामाच्या दिशेने पळाला.....

            आनंदला प्रदिपशी बोलल्यावर जरा मन हलकं झाल्यासारखं वाटू लागले....तसा आनंद कुणाशी फार मिसळत नसायचा..जेवढ्यास तेवढं ..कारण चार-पाच जण सोडले तर बरेचशे कामगार हे 'बिहारी भैय्ये' होते ... आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येकाला कसलं ना कसलं तरी व्यसन हे होतेच.. आनंदला मात्र कसलंच व्यसन नव्हतं... फक्त पेपर वाचायला त्याला खूप आवडायचं... फॉऊंड्रीत पेपर यायचा दररोज ..दुपारच्या सुट्टीत तो न चूकता वाचायचा...तर बाकीचे पेपरातली कोडी,चित्रं बघत बसायचे किती तरी वेळ आणि आपसांत कुजबुजायचे...याला काय समजायचं नाही. पण आज मन हलकं करण्याच्या नादात पेपर वाचायचा राहून गेला होता...ऑफिसच्या पारदर्शी काचेपलिकडे खूर्चीत बसून दिवाणजी आनंदकडेच रोखून बघत होता..मग आनंद नाईलाजाने मनातलं मळभ झटकत फॉऊंड्रीत शिरला....

           संध्याकाळी साडे पाचला भोंगा वाजताच सगळेजण बाहेर पडले ; तर आनंद ओव्हरटाईम करायच्या विचारात होता..... इतक्यात प्रदिप त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, "आज नको करुस ओव्हरटाईम ...चल घरी जाऊ ...तुझ्याशी जरा बोलायचं आहे.." आनंदला त्याला नाही म्हणण्याचा धीर झाला नाही...कारण प्रदिपने त्याला आज भावनिक आधार जो दिला होता....

         तिथून बाहेर पडल्यावर प्रदिप त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. दोन 'टक्कर चाय'ची ऑर्डर दिली...शुन्य मिनिटांत गरमा गरम वाफाळलेला चहा पुढ्यात आणून ठेवला, इराणी पोऱ्यानं.! चहाच्या नुसत्या वासानंच तरतरी आल्यासारखे झालं...शांतपणे आनंद कपाने चहा पित होता तर प्रदिप बशीत चहा घेऊन मनसोक्त भुरके मारत होता....पण तो आवाज आनंदला खूप किळसवाणा वाटत होता..तर निमिषभर त्याचं कौतूकही ...किती स्वच्छंदी लाईफ जगतो हा ! ... ... आणि एक आपण......! चहा पिल्यावर मात्र प्रदिपने मिशा पुसत बोलायला सुरुवात केली.."मग आनंदबाबू ! काय ...कशी करणार वहीनींंची नाराजी दूर..?" या प्रश्नाने भानावर येत आनंद उत्तरला, "माणसानं अंथरुण पाहून पाय पसरावं...आणि तुला तर सगळं माहीत आहे ..कसं शक्य आहे?....." त्याचं वाक्य मध्येच तोडत प्रदिप म्हणाला, "शक्य आहे....हे घे अडीच हजार ! " असं म्हणत त्याने पैसे आनंदच्या हातावर टेकवले. ते पाहून आनंद गडबडून गेला...."अरे एवढे पैसे... !! तुझ्याकडे कसे आले ? आणि एवढे पैसे मी परत कसे आणि केव्हा करणार ..??? छे ! मला नको पैसे ...मी समजवीन तुझ्या वहिनीला...ऐकेल ती माझं ..'ऋण काढून सण' करायची काय गरज ..!?? आगोदरच मरणाचं देणं झालंय डोक्यावर..." त्याचं बोलणं मध्येच तोडत जरा दरडावणीच्या सुरातच प्रदिप म्हणाला, "अरे तुला पैसे कोण मागतंय परत ....तूझ्याकडे येतील तेव्हा दे....मग तर झालं...!?? अरे तू माझा मित्र ..तू मला मानत नसला तरी मी मानतो तुला माझा मित्र..! मित्रानं मित्राच्या मदतीला धावून यायचं नाही तर मग कोणी ?! जा ... मस्त वहिनीसाठी त्यांच्या आवडीची साडी घेऊन जा ...एकदम सरप्राइज दे.....यार नशीब माझं लग्न झालं नाही, ... नाही तर तुझ्यासोबत मलाही घोडा.......असता दोन - अडीच हजाराला‌.. " आणि मोठ्यानं घोड्यासारखा खिदळला..... प्रदिपच्या या कोपरखळीने आनंदच्या डोळ्यासमोर घोडा तरळला आणि तो कसनुसं हसला....पण प्रदिपच्या या भावनिक बोलण्यानं आनंदला पैसे घेणं मात्र भागच पडले. 'पैसे लवकरच परत करेन' असं म्हणत त्याचे आभार मानले... आणि त्याचा निरोप घेतला ...

       'पैसे परत कसे करायचे?' असा विचार करतच एक-दीड किमी.ची पायपीट करत तो रुईने परवा बोलता बोलता सांगितलेल्या दुकानात शिरला. दुकानात सगळीकडे नुसता झगमगाट होता. राजस्थानी सेल्समनला हव्या असलेल्या साडीचं नाव सांगितले .. आणि तो एकापेक्षा एक भरजरी साड्या दाखवू लागला तर मध्येच एखादी साडी अंगावर कशी दिसेल ते स्वत:भोवती साडी नेसूनही दाखवू लागला....त्या लखलखणाऱ्या साड्या पाहून तो ही हरवून गेला....आपली रुई कुठल्या साडीत अधिक खुलून दिसेल ते कल्पना करु लागला....त्यातल्या एक-दोन भावलेल्या साड्या बाजूला काढल्या ....त्याचे फोटो काढले ....ते रुईला पाठवायचे आणि तीलाच विचारायचे कोणती घेऊ म्हणून असं त्याला क्षणभर वाटले ...पण त्याच्या मनात 'सरप्राइज' घोळत होते..म्हणून त्याने फोटो पाठवलेच नाहीत. शेजारीच दोन बायका त्यांच्यासाठी साडी सिलेक्ट करता होत्या....त्यांच्यासमोर साड्यांचा ढीग टाकला होता तरी त्यांना कुठली साडी पसंत पडत नव्हती , त्यांना साड्या नेसून दाखवून दाखवून तिथला 'सेल्समन' पार रडकुंडीला आला होता आणि तेवढ्यात त्यातल्या एकीचे लक्ष आनंदने बाजूला काढलेल्या साड्यांवर गेलं...तिने लगेच मधाळ भरल्या आवाजात विचारलं " तुम्ही दोन्ही साड्या घेणार आहात की.... ?" आनंद लगेच म्हणाला ,"नाही एकच घ्यायचीय ...पण तुम्ही मला मदत करा कोणती घेऊ यातली...?" त्या दोन्ही बायकांनी मग मात्र त्यातली एक साडी एका मिनिटात पटकन सुचवली, हे विशेष !!....आनंदने पण त्यांचे आभार मानले....दुसऱ्यां कोणासाठी साडी घ्यायची तर लगेच पसंत आणि स्वत:साठी घ्यायची तर .......नाना चौकशा आणि शंकाकुशंका !! पोत चांगला आहे का? रंग जाईल का? सेम पॅटर्न मध्ये जरा वेगळा कलर नाही का? ह्यांव् नाही का आणि त्यांव् नाही का?! .अशा एक ना अनेक ....बरं एवढं सगळं जमून आलंच तर बिलात बारगेनिंग...अशा आपल्या सबंध पृथ्वीतलावरील अगदी दक्षिण ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या सगळ्या बायका इथुनतिथून सारख्याच ! असो.....

     बीलाचे तेवीशे रुपये झाले...आनंद म्हणाला, "अहो ! आमच्या शेजारच्या वहिनींनी एकवीसशेला नेलीय ओ.....हो इथूनच.." दुकानदाराचं ठेवणीतले उत्तर "अरे बाबा , तो इस्टॉक् शंपला कधीचा... शॉर्टेज आहे .... दो तीन दिन बाद आओगे तो यही सारी़ दो हजार में भी मिलेगी.. लेकीन अभी नहीं...कल बटपौरणिमा है ना.!!" नाईलाजाने आनंदने पैसे चूकते केले आणि आता घरी गेल्यावर रुई किती खुष होईल!!? असा विचार करत घराकडे निघाला...वाटेत माळ्याच्या दुकानावर थांबून छानसा गजरा घ्यायला नाही विसरला....कारण त्याला रुईनं गजरा माळलेलं आवडायचे तर रुईला आनंदने स्वत:च्या हाताने तीच्या केसात गजरा माळणे..!! गजऱ्याचे तीस रुपये मात्र त्याने मुद्दामच स्वत:च्या पैशातून दिले ,प्रदिपने दिलेल्या पैशातून नाही.....कारण साडी त्याला नाईलाजाने घ्यावी लागली होती, पण गजरा मात्र त्याने मनापासून प्रेमानं घेतला होता .. उसन्या प्रेमानं नव्हे!!

        घरी गेल्यावर स्वयंपाकखोलीतला अंदाज घेत त्यानं गुपचूप आपल्या खोलीत बेडखाली साडी लपवून ठेवली. फ्रेश होऊन खुर्चीत क्षणभर विसावला; इतक्यात रुई चहा घेऊन आली .. आणि न बोलताच चहा टेबलावर ठेऊन परत गेली. 'म्हणजे मी आल्याची चाहूल लागली होती तर ... आणि अजून मौनात आहेत वाटतं.. बाईसाहेब!!' असं मनाशी बोलत चहा पिऊ लागला....त्याचं मन उगाचंच त्या इराण्याच्या हॉटेलवरच्या टक्कर चहाशी घरातल्या 'पाणचट' चहाची तुलना करु लागलं‌.... मग त्यानं मुकाट्याने तो चहा एक दोन घोटातच संपवला.... जेवणावेळी पण हीच गत ! रुई फारशी बोललीच नाही ...आनंदला मात्र राहून राहून आपल्या नावाचं सार्थक झाल्यासारखे वाटत होतं.

        रात्री उशीरा सगळी कामं आटोपून रुई खोलीत आली तेव्हा आनंद नेहमीप्रमाणे टेबलाजवळ कुठल्या तरी जुन्या वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसला होता. छोटी पिहू कधीच झोपी गेली होती...रुईने पण तीच्या शेजारी अंग टाकुन दिले... नेहमीप्रमाणे थोडावेळ मोबाईल चाळला आणि अंगावर चादर ओढून झोपली... थोड्यावेळाने आनंद पण उठला आणि अंथरुणावर येऊन पडला. इतक्यात रुईच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजली .नोटीफिकेशन चेक केलं तर Andy! हो... ती लाडानं आनंदला ॲंडीच म्हणायची.....नेहमीसारखेच कायतरी जोक टाकून हसवायचे , बोलायचे असेल, असा विचार करत पाहते तर काय चक्क साडीचा फोटो !! ...मग मात्र तिला रहावलं नाही ती पटकन उठून बसली आणि विरुद्ध बाजूला तोंड करून झोपेचे सोंग घेतलेल्या आनंदला जाऊन बिलगली ....आणि आनंदला आपलं हसू आवरता आवरत नव्हतं....आनंदने लगेच बेडखाली लपवलेली साडी तीच्यासमोर धरली..तीने अधीरपणे ती उघडून बघितली आणि तीला खूप आनंद झाला...ती हरखून साडी पाहण्यात हरवून गेली..आणि आनंद कौतूकाने तीच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळण्यात हरवला होता. मग आनंदने एक कागदी पुडा तीच्यासमोर धरला.. रुईने लगेच ओळखले,"गजरा..!!" तीने खूप हळूवारपणे तो गजरा हुंगला आणि आनंदची तीने माफी मागितली..".मी परत कधी अबोला धरणार नाही " असं म्हणत ती त्याच्या बाहुपाशात विसावली......त्यापेक्षा 'अवाजवी हट्ट करणार नाही' असं जर म्हणाली असती तर अधिक बरं झालं असतं ,असं आनंदच्या मनात क्षणभर वाटून गेलं.

         'शी ...! तुमच्या कपड्यांना, अंगाला फॉऊंड्रीतला वास येतो... मला कसंतरीच होतं ' असं कधीमधी म्हणणारी रुई आज मात्र आनंदला खूपच घट्ट मिठी मारुन 'उद्या सव्वाशे वहिनी माझीही साडी बघून कशा चाट पडतील आणि बाकीच्या बायकांचं तर... काय विचारायलाच नको' ...असा विचार करत करत मोठ्या समाधानाने झोपी गेली होती...सरप्राईजचा आनंद जरा ओसरल्यावर ' उसने घेतलेले पैसे कसे परत करायचे ?', हा प्रश्न परत डोक्यात वळवळू लागला..नि विचार करत आड्याकडे नजर लावून आनंद पडला होता......

         सकाळी लवकर उठून आनंद कामावर गेला, तर रुई सणासुदीच्या कामात जुंपली होती. कामावर गेल्या गेल्या तो प्रदिपला जाऊन भेटला. त्याने सविस्तर सांगत प्रदिपचे आभार मानले ...प्रदिप म्हणाला, "दोस्ती में नो सॉरी नो थॅंक्स् !" बोलता बोलता प्रदिप पुढे म्हणाला की, "आज दुपारी दांडी मारु कामाला नि पिक्चरला जाऊ.." सुरुवातीला आनंदने आढेवेढे घेतले पण त्याचा नकार जास्तवेळ नाही टिकला. दोघेजण दुपारी कंपनीतून बाहेर पडले. रिक्षात बसून ते सिटी प्लाझाला पोहचले..अजून बाराचा शो संपायचा होता. मग प्रदिप म्हणाला, "चल जरा शेजारी 'बिअर शॉपी'त जाऊन येऊ" . आनंद म्हणाला, "मी नाही घेत...नको". "अरे ! तुला कोण घे म्हणतंय ...मी तर घेऊ की नको??!! "असं म्हणत आनंदला जवळ जवळ ओढतच घेऊन गेला. तिथे आतमध्ये भरपूर गर्दी होती....त्याला उचंबळुन आल्यासारखे वाटत होते. पण प्रदिपचं होईपर्यंत त्याला तीथं बसणं भागच होतं. तिथंच मग प्रदिपचा एक जूना मित्र गाठ पडला...तो खूप श्रीमंत असावा बहुतेक...त्याच्या कपड्या,बोलण्या-चालण्यावरुन आनंदने अंदाज बांधला.... दोघांनी बराच वेळ गप्पा मारता मारता 'ब्लॅक डॉग'चा दोघांत एक खंबा रिचवला तर आनंद चकण्यावर ताव मारत होता... सगळं बिलंही त्या मित्रानेच दिलं , व निघून गेला..बिलाचा आकडा ऐकून आनंद मनात म्हणाला, 'ऐवढ्या पैशात माझा महिन्याचा घरखर्च भागला असता....!'

         ते दोघं जण बाहेर आले , तेव्हा साडे तीन वाजले होते नि पिक्चर सुरू होऊन बराच झाला होता...मग त्यांनी फिल्म पाहायची कॅन्सल केली. आनंदने बोलता बोलता त्याला विचारले, "तो तुझा मित्र कोण होता रे..? आणि खूप श्रीमंत वाटत होता.." ते ऐकून प्रदिप हसत म्हणाला, "अरे तो आपल्यासारखाच होता पण आता लाखात खेळतो.." व आनंदच्या कानाशी लागत हळुच म्हणाला..."तो मटका बुकी आहे.." - "म्हणजे ??" आनंदचा हा बाळबोध ऐकून तो हसत म्हणाला,"चल., तुला दाखवतो..."

           दोघेही परत रिक्षात बसले..'चांदणी चौक उस्मानभाई का अड्डा' असा पत्ता सांगून तो दबक्या आवाजात मटक्याविषयी आनंदला समजेल अशा भाषेत माहिती सांगू लागला..मुंबई ,कल्याण,ओपन- क्लोज, पान ,डबल अशा कामावरील इतर लोकांच्या चर्चेत नेहमी ऐकलेल्या शब्दांचे अर्थ तो आनंदला समजावून सांगत होता. आता आनंदला कळलं की, कामावरचे सगळे लोक पेपरच्या चित्रात कसले लपलेले आकडे शोधायचे आणि का?? .प्रदिप म्हणाला, "अरे.. लक् लागली ना.. तर चार - पाच रुपयात तू तुझं सगळं कर्ज भागवू शकशील....!" हे ऐकताच आनंदचे डोळे चमकले....

         चांदणी चौकात उतरुन ते पायीच एका बिल्डींंगच्या तळघरात शिरले..तो परिसर अगदी अस्वच्छ वाटतं होता.एकदम कोदंट वातावरण होतं. जिथं तिथं भिंतीवर मावा-गुटख्याच्या ,पानाच्या पिचकाऱ्या मारलेल्या होत्या .....तिथं एका बाजूला पत्त्यांचा क्लब सुरु होता....लोक पैशांवरती खेळत होते. त्याच्या विरुद्ध बाजूला कॅरम सुरू होता......तर पार कोपऱ्यात एका केबीन समोर लोकांची प्रचंड गर्दी होती ...पैसे दिले जायचे आणि चिठ्ठि वर विशिष्ट आकडे दिले जात होते...आनंद सगळं विस्फारल्या डोळ्यांनी पहात होता...नुकताच कुणाला तरी खूप मोठा मटका लागला होता...नि त्याच्या तर्फे सगळ्या क्लबात फुकट दारु वाटली जात होती... आनंदच्या डोळ्यापुढे कर्जाचे आकडे फेर धरून नाचू लागले होते नि ' एकदा नशीब आजमावून पाहूया की नको' या द्वीधा मनस्थितीत तो तीथं केबीनबाहेर घुटमळत होता...एवढ्यात कोण तरी ओरडत आलं 'मामा आला..पळापळा...' .सगळ्यांची पांगापांग सुरू झाली.. आनंदला काहीच कळेना...मामा आला तर का म्हणून पळायचं..!? ..शेवटी तोही ज्या दिशेने आला होता त्याच दिशेला पळून जाऊ लागला ...बाकीचे दुसऱ्याच दरवाजाने पसार झाले..पण आनंदसारखे नव्यानेच जे आले होते ते मात्र सरळ तळघराच्या जीन्यातच पोलिसांना अलगद सापडले ..दहा बारा लोक! सगळे भेदरलेले होते ..आता आनंदला सगळा उलगडा झाला की लोक का पळून गेले...

           बाहेर रस्त्यावर आल्यावर बघ्यांची दुतर्फा गर्दी...!  त्यातच एका आडोशाला उभा राहून प्रदिप त्याच्याकडे पाहत होता.. पण त्याचाही नाईलाज होता. सगळ्यांना पिंजऱ्यात टाकून पोलिस चौकीवर नेण्यात आले. तिथं एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले...आनंदला आता मात्र पश्चाताप वाटत होता...बाकीच्यांचीही तीच अवस्था...! इतरांच्या बोलण्यावरून त्याला असं समजलं की, पोलिसांना त्याचा ठरलेला हप्ता न दिल्याने त्यांनी रेड मारली होती ...थोड्याच वेळात तीथं तो क्लबचा मालक उस्मानभाय आला...त्यानं पैसे भरून आपल्या काही खास लोकांना सोडवून नेलं ..जाताना बाकीच्यांना म्हणाला, "ये चिंधी चोरके सामने दो -तीन हजार फेक दो .तुरंत छोड देंगे....वरना सडते रहो अंदरही... मुफ्त की रोटीया तोडते .." तेवढ्यात तीथं प्रदिप आला ..त्यानं सायबाशी तोडपाणी केलं आणि दोन हजारात सोडायचं कबूल केले... त्याने खोलीच्या दारात येऊन आनंदला ते सांगितले. पण आनंदकडे तितके पैसे नाहीत हे त्याला माहित होतं.त्याच्याकडेही तेवढे नव्हते. प्रदिपला आता खूप वाईट वाटत होतं....या साध्या भोळ्या मित्रावर माझ्यामुळे हा प्रसंग ओढवला...तो आनंदला म्हणाला ,"मी बघतो काय जमतंय का ?" आणि तिथून निघून गेला. साडे चार वाजत आले होते. आनंद निराश मनाने त्या खोलीतल्या एका बाकड्यावर बसला...बाबांना,रुईला, शेजारी पाजारी समजल्यावर काय होईल?, या कल्पनेनेच त्याचं डोकं बधीर झाले होतं.

        तासभर फिरुन कुठंच काही जमलं नाही म्हणून नाईलाजाने प्रदिप शेवटी आनंदच्या घरी आला. रुई नुकतीच वटपूजा करुन परतली होती‌... त्याने सगळी हकीकत रुईला सांगितली...ते ऐकून रुईच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन हजार भर रुपये लागतील हे सांगताच, तीने मनात काय तरी विचार करून कपाटावर ठेवलेली ट्रंक खाली काढली ...आत भरपूर साड्या होत्या त्यात ...सर्वात खाली हात घालून तीने एक साडीच्या घडीतून रुमालाचं छोटं गाठोडे बाहेर काढंलं... आणि त्याची गाठ सोडली ..तर आतमध्ये शंभर-पन्नास, दहा - वीस रुपयांच्या भरपूर नोटा होत्या..तीने घरखर्चातले आनंदच्या नकळत त्या साठवल्या होत्या.तीने त्या प्रदिपच्या समोरच काढून सर्व मोजल्या, तीन हजारभर होते...ते पाहून प्रदिपचा जीव भांड्यात पडला. रुईला तर काहीच सुचत नव्हते‌. पिहूला शेजाऱ्यांकडे ठेवून ती प्रदिप सोबत चौकीत पोहचली. रुईचा आवाज ऐकून आनंद दारात येऊन उभारला. "वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून बायका व्रत करतात तर याच दिवशी हे बघा काय करुन बसलेत!" असं आनंदकडे पाहत पोलीस म्हणाला. .... आनंदला मेल्याहून मेल्यासारखं झालं... रुईच्या अंगावर तीच नवी साडी होती..आणि त्या साडीत ती विलक्षण सुंदर दिसत होती... पण तीच्यावर माझ्यामुळे आज काय वेळ आली, असा विचार करत आनंदचा जीव तीळ तीळ तुटत होता. तीने पोलिसांना ठरलेली रक्कम दिली आणि त्यांनी आनंदला परत त्या नादी लागणार नाही असं ताकीद देऊन सोडलं ...तेव्हा आनंदची नजर प्रदिपच्या नजरेला भिडली पण प्रदिपने शरमेने मान खाली घातली कारण त्याला वाटत होतं आपल्यामुळे हे असं झालं, मीच त्याला तिथे घेऊन गेलो नसतो तर ....बाहेर आल्यावर तिघेही घरी जाण्यासाठी रिक्षात बसले... बराचवेळ कोणच कुणाशी बोलत नव्हते आणि अचानक आनंदने विचारले , पैशांची जुळणी कशी केली.? या प्रश्नाने रुई एकदम गडबडून गेली आणि तीच्या लक्षातच आलं नाही की आनंद हा प्रश्न विचारेल ...तीच्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडले, "सव्वाशे वहिनींकडुन घेतले उसने.... देता येतील सावकाश !" या वाक्यासरशी प्रदिपने रुईकडे पाहिले...तर तीने त्याची नजर टाळली... प्रदिपचा संशय खरा ठरला होता....तीने ते पैसे आनंदपासून लपवूनच साठवले होते....आणि असल्या बायकोच्या हौसे खातर तडफडणाऱ्या, कर्जबाजारी होणाऱ्या आनंदची त्याला जास्तच कीव वाटू लागली.

           तर इकडे मनात असूनही रुई त्याला पैशांबाबत खरं सांगू शकत नव्हती म्हणून तीचंच मन तीला खात होतं...कारण दोन महिन्यांपूर्वी बाबांच्या औषधाला पैसे कमी पडत होते...तेव्हांही तीने त्या पैशांबाबत ब्र शब्दही काढला नव्हता.. आणि आता जर खरं सांगितले तर ती आनंदच्या नजरेतून कायमची उतरली असती... आणि तेच तीला नको होतं....ती स्वत:ला दोषी समजू लागली ..तीला तीची चूक समजली होती....सव्वाशे वहिनींशी बरोबरी,तुलना करण्याच्या अविचाराने आपण उगाच हट्ट केला असं वाटू लागलं .....पण आता ती चूक सुधरणार नव्हती. कारण साडीसाठी प्रदिपकडून घेतलेले अडीच हजार व सव्वाशेवहिनींकडून रुईने घेतलेले दोन हजाराचे 'ऋण' फेडण्यासाठी आनंदला आता एकच मार्ग दिसत होता....तो म्हणजे 'उस्मानभाईचा अड्डा'!

                 - स्व🖋️🙏


Comments

Popular Posts