डील्
'ओखी' वादळाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात झपाट्याने बदल होत होता. रात्रभर तो 'घननिळ' संतत बरसतच होता. वारे ही जोर धरु लागले होते. सगळीकडे गारवा निर्माण झाला होता; आणि त्या अनुषंगाने 'पूर्वदक्षता' म्हणून मुंबईसह किनारी पट्टयांतील बऱ्याच शासकीय कार्यालयांना आजची सुट्टी देण्यात आली होती.आपणही पुण्याऐवजी मुंबईत असतो तर.....न जाणो आजची सुट्टी तर भेटली असती......!!; 'फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना जीव असतो का!?? इतरांना 'तो' नसतो का??',असा तौलनिक विचार करता करता रात्री कधी त्याला झोप लागली कळालेच नाही. मग सकाळी 'या' तथाकथित पक्षपातीपणाचा 'निषेध' म्हणून नित्यनेमाप्रमाणे आज 'जॉगींग'ला जायचेच नाही, असे ठरवून 'नीरज' मऊ रजईत गुरफटून झोपला होता. सकाळच्या त्या गारठवणाऱ्या वातावरणात त्याला बायको 'समीधा'ची आठवण आली व त्याने कुशीवर वळत शेजारी पाहिलं तर.. समीधा गायब..! समीधा नेहमीप्रमाणेच भल्या पहाटे उठून किचनरुममध्ये आपल्या कामात गुंतली होती. 'या ओखी वादळामुळे इतरांनी थोडीफार उसंत घेतलीय पण समीधा सारख्यां कित्येक गृहिणींचं काय?, त्यांना जीव नसतो का?... रोजचीच रांधा, वाढा, उष्टी खरकटे काढा...तेच ते!! यात त्यांनी कोणाविरुद्ध निषेध नोंदवावा??' असा पुसटसा विचार नीरजच्या मनात येऊन गेला आणि त्याला समीधाविषयी 'कणव' दाटून आली...- 'काही नाही..आज ऑफिसला जायचेच नाही, दिवसभर समीधाला सोबत द्यायची, तीच्या सोबत घरीच एखादी तीच्या आवडीची 'मूव्ही' पहायची ; आणि ब्रेकमध्ये तीच्या आवडीची 'कोल्डकॉफी' आपणच बनवुन द्यायची, तीने बऱ्याच दिवसांत 'हार्मोनियमला' हातही लावला नाही; समीधा एक उत्तम 'हार्मोनियमवादक' आहे,कामाच्या धांदलीत सवडीअभावी बिचारीची 'आवड' कोपऱ्यात धूळ खात पडून आहे ...पण आज मात्र तिला एखादं 'भावगीत' वाजवायला लावायचंच, वातावरण पाहून संध्याकाळी फिरायला जायचं नि येताना तीला छानशा हॉटेलवर 'डिनर' साठी न्यायचे...' अशा विचारांच्या शृंखलांवर शृंखला नीरजच्या मनात तयार होत होत्या..आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजू लागली...आणि झालं.....त्यांची विचार शृंखला तुटली ! पण तो तसाच झोपून राहिला आणि मोबाईलही वाजत राहिला...
त्या रिंगचा आवाज ऐकून किचनरुममधून समीधा ओरडली, "अरे...तुझी 'दुसरी' बायको कधीची ओरडतेय !!...बघ तरी ती काय म्हणतेय?" पण नीरज..... ! शेवटी समीधानेच तो मोबाईल आणुन नीरजच्या कानाला लावला व किचनमध्ये गेली; तो मोठ्या अनिच्छेनेच बोलू लागला....
पलिकडून आवाज आला- "हालो..! म्या संपतराव वाघमारे बोलतोय जी....पाडळीवरनं ! आपलं काल बोलणं झालतं नव्हं फोनवर...सायेब तुमी आज यतो बोल्ला हुता जी ...म्हणूनशान फोन केलाय जी.., आज येताय नव्हं??' यावर नीरज पटकन म्हणाला, "मला आज जरा तातडीच्या कामासाठी बाहेर जायचे आहे त्यामुळे मी ......." नीरजचं वाक्य मध्येच तोडत संपतराव काकुळत्या आवाजात बोलले, " नका जी...असं करु ..तो चांडाळ टपून बसलाय जी......बांध सोडून पार आत शिरलाय जी माज्या वावरात; तुम्ही या जी असं करु नकासा जी!!" नीरजला त्यांची विनवणी ऐकूच वाटेना...तो काहिसा त्रासिक स्वरात काहीतरी बोलून 'बोळवण' करायची म्हणून बोलला, "ठिक आहे ..मी बघतो!" यावर संपतरावांनी आनंदित स्वरात त्याचे आभार मानले आणि फोन कट केला.
नीरज पार वैतागून गेला. त्याला वाटले मनातले मांडे मनातच राहतात की काय..!? त्याने आज दिवसभर काय काय करायचे योजिले होते आणि......मग तो तसाच पडून राहिला. नीरज अजून उठला नाही म्हणून समीधा त्याला उठवायला आली; तर त्यांने तिलाच हळूच बेडवर खेचून घेतले...समीधाने नुकतीच अंघोळ केली होती; त्यामुळे केस अजून ओलेचिंबच होते....त्या ओल्या केसांच्या सुगंधित 'परिमला'ने तो धुंद होऊन गेला आणि त्याचे हात त्याच्या मनातल्या भावना आपसूकच व्यक्त करु लागले व 'त्या स्पर्शाने समीधाही रोमांचित झाली ; पण ती नीरजच्या विळख्यातून निसटत अचानक उसळून उभी राहिली नि .."अय्या..! भाजी करपली वाटतं.."असं ठेवणीतलं 'बचाव अस्त्र' डागत मिश्किल हसत बोलता बोलता किचनरुमकडे धावली......तीच्या पाठमोऱ्या कमनीय बांध्यावर रुळणाऱ्या केससंभाराकडे एकटक पाहत तो मनाशीच बोलला, "कमाल आहे! कसं काय बुवा या जगातल्या तमाम 'स्त्री'वर्गाची नेमक्या हातघाईच्या लढाईलाच कधी 'भाजी' करपत असते ; तर कधी दूधच उतू जात असते?!!, देवच जाणे !. ...महाभारतात द्रौपदीच्या मदतीला 'श्रीकृष्ण ' धावून आला होता , पण आता कलयुगातल्या सगळ्याच द्रौपदींना वाचवण्यासाठी एकटा कोणा-कोणाला म्हणून मदत करणार??!! म्हणूनच देवानं ह्या 'भाज्या ' निर्माण केलेल्या असतील की काय?!!" अशा स्वत:लाच पडलेल्या मजेशीर 'यक्षप्रश्नाचं' त्याला मोठं हसू आले... समीधाच्या भारलेल्या सुवासाने नि सुहास्याने नीरजची झोप तर केव्हाच पळाली होती ; म्हणून संचारलेल्या उत्साहाने आवराआवर करण्यासाठी तो बाथरुममध्ये शिरला.
रोजची 'नित्यकर्मे'लगबगीने आवरुन, गुणगुणतच तो सरळ किचनरुममध्ये आला व ओट्याजवळ कामात तल्लीन असलेल्या पाठमोऱ्या समीधाला जाऊन बिलगला; तशी समीधा म्हणाली, "महाराजांचा नूर आज जरा निराळाच दिसतोय ...ऑफिसला जायचे आहे की नाही??......निदान तो फोन आलेला..., तो तरी लक्षात आहे की नाही खाविंदांच्या!?" तीच्या या निरस बोलण्याने नीरज नाराजीच्या स्वरात बोलला, "काय पण तुम्ही बायका?! ..जेव्हा कामानिमित्ताने दिवसभर घराबाहेर असतो; तेव्हा बोलता की आम्ही वेळंच देत नाही; आणि आता घरी थांबायचं म्हणतोय तर... कामाची आठवण करून देताय. काय बोलायचं तुमच्या अशा दुटप्पी भूमिकेला!?" यावर नेहमीप्रमाणे लाडाने नीरजचं नाक खेचत ती म्हणाली, "अले...अले..माझं बबडू ...रुचले का माझं बबडू !?" व खो-खो हसत सुटली...तीच्या या हसण्याने नीरज अधिकच हिरमुसला आणि लायब्ररी रुममध्ये निघून गेला...काम सोडून त्याच्या पाठोपाठ समीधाही गेली नि नीरजच्या समोर बसता बसता शांतपणे म्हणाली, "अरे ते मघाशी फोनवर तुला किती आर्जवी करत होते?!! ....आणि तु ही त्यांना ठिक आहे ..बघतो म्हणालास ..म्हणजे याचा अर्थ ते तू येतोयसच असा गृहीत धरणार ना!? आणि तू गेला नाहीस तर ... त्यांना कसं वाटेल??" तीच्या समजावणीने तो काहिसा भानावर आला व त्याला तिचे म्हणणे पटले ही ! ...पण तसे न दाखवता,मुद्दाम काहीशा लटक्या रागाने बोलला, "ते सगळं ठिक...पण तुलाच आज मी घरात नकोय." आणि चोरट्या नजरेने समीधाच्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळू लागला. समीधा पटकन नाटकीय स्वरात बोलली, "महाराज ! तसं काही नाही हं !! ..उलट इकडची 'स्वारी' कधी एकदा राजवाड्याकडे परततेय असं आम्हांस वाटतं... सांजवेळी तर आमचे कर्ण स्वारींच्या 'चतुश्चक्र रथाला' (कार) जुंपलेल्या अश्वांच्या पदन्यासाचाच 'माग' घेत असतात." हे वाक्य ऐकताच नीरजच खळखळून हसत सुटला व त्याचा राग कुठच्या कुठे पळाला. तो ऑफिसला जाण्यासाठी तयारी करु लागला आणि 'माझा नीरज किती निरागस व समजूतदार आहे !' असा विचार करत समीधा कौतुकाने नीरजकडे पहात बसली.
*****************************************
ऑफिसमध्ये पोहचल्यावर.... - नीरज आल्याचे कळताच त्याच्या बॉसने मि. कुलकर्णींनी त्याला आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतले. 'आल्या आल्या इतक्या तातडीने का बोलावले असेल?' असा विचार करतच, तो बॉस समोरच्या खुर्चीत येवून बसला. नीरजचा बॉस म्हणजे खूप हुशार,धुर्त माणुस!! पक्का बिझनेस मन! तो पैशांसाठी काहीही करायला मागे - पुढे पाहत नसे. 'व्हेअर मनी देअर कुलकर्णी' असं तो हसत हसत नेहमी म्हणायचा... त्याने अनेक उलाढाली करुन आपला 'रियल इस्टेट व त्यासंबंधीत इतर व्यवासाया'त जम बसवला होता. त्यापैकीच 'भूमापन व मूल्यनिर्धारण डिपार्टमेंट'चा नीरज प्रमुख होता. मि.कुलकर्णींच्या अनेक 'भल्याबुऱ्या 'कामात त्याने साथ दिली होती; म्हणूनच पाचवर्षांपूर्वी असिस्टंट म्हणून रुजू झालेला नीरज, अवघ्या दोनच वर्षांत त्या डिपार्टमेंटचा प्रमुख बनला होता. सुरुवातीला नीरजच्या सदसद्विवेकबुद्धीने अशी कामे करण्यास आढेवेढे घेतले पण मि. कुलकर्णींसारख्या मुरलेल्या मुरंबी बिझनेसमनने 'आयुष्यात काहितरी मोठं अचीव्ह् करायचे असेल तर असे शॉर्टकट् मारावेच लागतातच...'It's an business deal' असं म्हणंत आपले विचार नीरजच्या गळी उतरवले आणि लहानपणीच वडिलांचं 'छत्र' हरवलेल्या व सदा गरीबीशी दोन हात करत आलेल्या नीरजने हे सगळे व्यावसायिक पातळीवर स्विकारलेही...व त्यानंतर मात्र त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही ! लवकरच त्याने पुण्याजवळील एका उच्चभ्रू उपनगरात स्वत:च्या मालकीचा फ्लॅटही घेतला. गेल्याचवर्षी लग्न झालं आणि समीधासारखी सुलक्षणी, सावळी पण देखणी मुलगी नीरजच्या नव्या घराचं 'माप' ओलांडून 'गृहलक्ष्मी' म्हणून नांदायला आली. नीरजला जणू स्वर्गच अवतरला असं वाटू लागलं ! त्या दोघांनी नीरजच्या म्हाताऱ्या आईला गावाकडे न राहता त्यांच्या सोबतच रहाण्याची विनवणी केली ; पण.. "तुम्हा दोघांच्या चिमणा-चिमणीच्या नव्या नव्या संसारात, माझी.. मेली म्हातारीची कशाला उगी लुडबुड ....?!! तिसऱ्याची चाहुल तरी लागू दे...मग बघा, मी इथंच ठाण मांडून बसते." असं त्याची आई बोलली. पुढे ज्या-ज्या वेळी आईच्या सोबत राहण्याचा विषय निघे, तेव्हा तेव्हा तिचं हे 'पालुपद' ठरलेलंच...!; आणि समीधाचं लाजून चूर होणंही..ठरलेलंच!! असो..!!
नीरज बसताच बॉसने बोलायला सुरुवात केली .."अरे नीरज,परवा पाडळीवरुन वाघमारे क्लायंटचा फोन आला होता बघ..!"
- "हा सर! आज सकाळीही त्यांचा मला फोन आला होता.त्यांचा काय मॅटर आहे सर?" ......"अरे ! त्यांची जमीन आहे पाडळीत..पुणे-सातारा हायवे लगत..त्यांच्या बांधाला लागून आपलेच जुने एक क्लायंट कम् मित्र आहेत.. मि.झु़ंजारराव पाटील, यांचीही जमीन आहे. दोघांत जमीनीच्या हद्दीवरुन वाद आहे. खटला सरकार दरबारी पडून आहे. संपतरावांचं म्हणणं आहे की झुंजाररावांनी त्यांची जमीन बळकावलीय आणि त्यात तथ्यही आहे..... दोघांच्या जमीनी बांधाला-बांध लागून असल्या तरी वाघमारेंची जमीन 'पाणस्थळ' नि झुंजाररावांच्या जमीनीत फारसं पाणीच नाही..!. पण झुंजारराव नावाप्रमाणेच ...झुंजार!! त्यात पाटिल..!! त्यांनी आपल्या जमीनीत चार चार बोअर्स मारल्या पण 'जलदेवता' काही प्रसन्न झाली नाही..म्हणून "तुमच्या शेतात मी स्वखर्चाने विहीर पाडतो.... त्यानं तुमच्या शेतीलाही पाण्याची अधिकची सोय होईल" असं सांगत गोड बोलण्याने अडाणी संपतरावांना फशी पाडलं. सुरुवातीला एक-दोन वर्षे पाणी दिलेही.... मग मात्र पाणी देणं बंद केलं व त्या विहीरीसह लगत असलेल्या जागेवरही स्वत:चा हक्क सांगू लागले. संपतरावांनी केस टाकली, पण झुंजाररावांनी पैसा फेकून केस बोर्डावरच येऊ दिली नाही. शेवटी सरकारी 'दिरंगाई'ला कंटाळून संपतरावांनी 'वाद' सामोपचाराने मिटवण्यासाठी आपल्याकडून 'कंसल्ट' करायचं ठरवलं आहे ; पण झुंजारराव आपले मित्र आहेत... तरीही आपल्याला दोन्ही कडून 'मलीदा' खायचा आहे तेव्हा ......."
-"तेव्हा ती जमीन झुंजाररावांचीच आहे असं सिद्ध करायचं...आणि ते जमलं नाही तर ती जमीनच त्यांना विकण्यासाठी संपतरावांना तयार करायचं असंच ना सर !!?" असे नीरजने विचारले. यावर टाळी देत छद्मी हसत बॉस म्हणाला, "There you are ! My boy..!! म्हणूनच नीरज मला तू आवडतोस..... मला जे म्हणायचं आहे तेच बेअरींग तू नेमकं पकडतोस...तुला पाहिलं की तुझ्यात मला तरुणपणातला'मी'च दिसतो .well done my boy लाग तर मग कामाला...!"
नीरज होकार भरत केबीन बाहेर जाऊ लागला तेंव्हा पाठीमागून आवाज आला ...."आणखीन एक .!! आपण झुंजाररावांशी 'संधान' साधून आहोत; हे संपतरावांना कळता कामा नये... ओके?." यावर नीरज ने मागे वळून फक्त अंगठा उंचावला व केबीनबाहेर पडला.
******************************************
बॉसने लग्नावेळी 'गीफ्ट्' दिलेल्या कारने पाडळीच्या दिशेने जाताना, बॉसचा आपल्यावरचा विश्वास पाहून तो मनोमन सुखावला होता. दिलेल्या पत्त्यावर पोहचताच...हायवेच्या बाजूलाच असलेल्या पांदीतून एक 'साठी' ओलांडलेला म्हातारा गाडीच्या दिशेने लगबगीने येताना दिसला. तो जवळ येताच म्हणाला, "रामराम सायब ! म्या संपू वाघमारा..., म्याच तुमाला सकाळच्यापारी फोन केलता जी...!" साहेब उशीरा का होईना पण आले याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. "माझ्या मागं सावकाश या जी ,पांदीतनं!!.....ते कसलं वावटूळ येणार हाय म्हणं. ...(आभाळाकडं बघत) म्हणून शान ह्या बाबानं रासारी रिपरिप लावल्या....!" नीरज संपतरावांच्या मागोमाग कालच्या पावसानं झालेला चिखल चुकवत जाऊ लागला. तथाकथित वादाच्या साईटवर येऊपर्यंत 'झुंजाररावांनी कसे गोड बोलून आपल्याला फसवलं' याची कर्मकहाणी सांगितली आणि नीरजही आपण ती पहिल्यांदाच ऐकतोय असं भासवत चुकचुकत होता...संपतरावांनी आणलेले जमीनीचे कागदपत्रे पाहताच त्याने ताडले की, झुंजाररावांचीच जमीन आहे असं भासवणं अवघड!! तरी ती जमीन झुंजाररावांस विकण्यास संपतरावांना नक्कीच तयार करु शकू, असा आत्मविश्वास त्यास संपतरावांचा 'स्वभाव नि अवतार' पाहता आला. तो अंदाज घेत संपतरावांना विचारता झाला की, "किती वर्षे झाली झुंजाररावांनी तुमच्या जमीनीवर हक्क गाजवायला सुरुवात केली?". "दहा-अकरा वरसं झाली आसतील बगा जी..!" संपतराव मोघमपणे म्हणाले. नीरजने अंदाजाने खडा टाकला "मग आतापर्यंतच्या वहिवाटीच्या आधारावर तो तुमच्या जमीनीवर खरंच हक्क सिध्द करुन शकतो." यावर अगतीकतेने संपतराव म्हणाले, "कोरट-कचरी करुन बि कायच जमंना....म्हणून आता तुमीच सांगा जी..काय कराय पायजेल?" नीरजने आपला शेवटचा निर्णायक डाव टाकायला सुरुवात केली... "तुमची जमीन अशीच त्यांच्या घशात घालण्यापेक्षा...त्यांच्याशी 'सुलाह' करा आणि तेवढ्या जमीनीचा तुकडाच झुंजाररावांना विकून टाका"... हे ऐकताच काळजाला गरं पडल्यासारखे संपतराव म्हणाले, "आसं कसं जी.....!? माज्या वाडवडलांची 'पांढरी' म्या इकू कसं जी?!" संपतरावांचं ते भावनिक बोलणं ऐकून नीरज जरासा वरमला; आणि हळुवार समजावणीच्या सुरात म्हणाला, "वाडवडिलांची जमीन अशी फुकटच त्यांच्या ताब्यात आहे की इतकी वर्षे...त्यापेक्षा ती त्यांनाच विकून चार पैसे तरी गाठीला जमवा...आजकालचे दिवस हे असे....कधी काय होईल काय सांगता येत नाही , त्यात तुमचं वयही झालेलं...मी तुम्हाला तुमच्या मुला समानच आहे...माझं ऐका..! त्या जमीनीची बाजारभावापेक्षा चढ्या भावानं 'किंमत' मिळवून द्यायची जबाबदारी माझी!! हवं तर तुम्ही दोन दिवस विचार करा....शांतपणे ! मग मला सांगा !" यावर संपतराव काहिच बोलले नाहीत. पण त्यांच्या डोळ्यात न्याहाळत बाण वर्मी लागलाय ,याची खात्री पटताच, नीरज त्यांचा निरोप घेत चिखलामधील आल्या पावलांवरच पाऊल ठेवत, चिखलात आपले 'इंम्पोर्टेड शूज' जास्त खराब होणार नाहीत याची काळजी घेत गाडीच्या दिशेने जाऊ लागला..आणि दूरदूर जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे हताशपणे पाहत असताना, अचानक डोळ्यावर अंधारी आल्यासारखे होऊन संपतरावांनी त्या आपल्या वाडवडिलांच्या पांढरीच्या चिखलातच बैठक मारली....
******************************************
नीरज मग ऑफिसला न जाता सरळ घरी आला. त्याच्या गाडीचा आवाज ऐकताच समीधा दरवाजात येऊन आधीच उभी राहिली होती. आज नीरज लवकर आल्याचे आश्चर्य आणि मनात झालेला आनंद यांचे संमिश्र भाव तीच्या चेहऱ्यावर दिसत होते. काहीच पू्र्वकल्पना नसताना रोज उशीरा येणारा नवरा एखाद्या दिवशी लवकर घरी परततो तेव्हाचा 'आनंद' बायकोला कोण सुखद धक्काच देऊन जातो हे फक्त बायकाच जाणोत...... !!
नीरज'फ्रेश' होण्यासाठी सरळ बाथरुममध्ये गेला आणि समीधा त्याच्या आवडीची 'आद्रकवाली चाय' बनवायला किचनरुममध्ये ..!! लग्न ठरल्यानंतर लग्नाआधी दोघेजण एकदा भेटले होते; तेव्हांच दोघांनीही एकमेकांच्या सर्व आवडी-निवडी जाणून घेतल्या होत्या. नीरजच्या सर्व आवडी लग्न झाल्यापासून आजतागायत ती जपत आली होती.... तर तीच्या आवडी कामाच्या व्यापात नीरजला फारशा जपता येत नसल्या तरी त्याच्या आठवणीत मात्र नक्कीच होत्या....! नीरज किचनरुममध्ये येता येताच म्हणाला, "तुम्हां बायकांना कसं काय साधतं हे बुवा!?....की नवऱ्याला कधी काय हवंय-काय नकोय ते..?!!" यावर समीधा फक्त गोड हसली..पण तीच्या चेहऱ्यावर लाजेनं 'लालीमा' चढली होती...त्याला चहा देऊन तीही स्वत: फ्रेश व्हायला गेली....याच दरम्यान त्यानंही समीधाच्या न कळत तीच्या आवडीची कोल्डकॉफी बनवली.समीधा बाथरुममधुन बाहेर पडते न् पडते तोच ..."लिजीए मॅडम् !! पेश है आपकी पसंदीदा 'कोल्ड्कॉफी' ...विथ् लेमन फ्लेव्हर...!" असं म्हणत तीच्यासमोर 'कॉफीचा मग' धरला...हे पाहताच ती बिचारी अगदी गडबडून गेली तसंच लाजेनं चूर झाली...मग नीरजने सकाळी जसं ठरवलं होतं अगदी तसंच करत समीधाला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के दिले!! 'लेट नाईट डिनर' करुन घरी परतल्यानंतर, तो टिव्ही पाहत बसला... तर समीधा - दुपारची अर्धवट राहिलेली आपली कामं करण्यात किचनरुममध्ये गुंतली.
नीरज दिवसभर घराबाहेर राहत असल्याने, दिवसभराच्या अवतीभवतीच्या सर्व घडामोडीं जाणण्यासाठी तो रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी न चुकता न्यूज पहातो आणि आताही तो टिव्ही समोर बसून खूप काळजीपूर्वक न्यूज पाहत होता. सगळ्या न्यूज चॅनल वर एकच ब्रेकींग न्यूज झळकत होती -
'पाकच्या ताब्यात असलेल्या 'कुलभूषण जाधव'ना भारतीय गुप्तहेर समजून फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना भेटायला गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाक सरकारकडून वाईट वागणूक दिली गेली...' अशी ती बातमी होती. नीरजही ती बातमी ऐकून काहीसा विचारात गढून गेला आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर त्याच बातमी संदर्भात एक मेसेज आला आणि तो त्यालाही खूप भावला ...त्यानेहीे तो मेसेज नेहमीप्रमाणे एका जबाबदार भारतीय नागरिकाप्रमाणे पटापट आपल्या इतर ग्रुपवर सेंड केला आणि एक 'भारतीय' म्हणून चांगलं काम केल्याच्या समाधानाने ....टि.व्ही बंद केला आणि बेडरुममध्ये झोपायला गेला.धावपळीने तो इतका थकून गेला होता की, बेडवर पडल्या-पडल्या झोपी गेला. समीधा सगळी कामं आटोपून बेडरूममध्ये आली आणि दिवसभर हुंदडक्या मारुन मारुन, दमून गेलेल्या जणू एखाद्या निरागस लहान मुलाप्रमाणे झोपलेल्या नीरजकडे पाहत पाहत तीही 'निद्रादेवीला' शरण गेली...!
*********************************************
दोन-चार दिवस असेच नेहमीच्या रुटीनप्रमाणे गेले...... 'ओखी'वादळही एव्हाना शमलेले होते...सृष्टीने कुस बदलत हुश् केले ! नि तिच्यासोबत समस्त सजीवांनीही....!! धास्तावलेलं जनजीवन पुन्हा नित्याप्रमाणे पूर्वपदावर आले..यादरम्यान नीरजने जाणीवपूर्वक वाघमारेंना फोन केला नाही आणि बॉसनेही नीरजला त्याबाबतीत छेडलं नाही; कारण बॉसला नीरजच्या कार्यक्षमतेबाबत तिळमात्रही शंका नव्हती नि नीरजला स्वत:बाबत...! त्याला वाटत होतं की, उशीरा का होईना पण मासा गळाला लागणारच आणि झालंही तसंच..! एके दिवशी अचानक नीरजला वाघमारेंचा फोन आला नि त्यांनी त्याला जमीनीसंदर्भात भेटायला येतोय, असे सांगितले. यावर लगेच नीरजने "तुम्ही कशाला त्रास घेताय काका?!! 'मी'च तुम्हाला भेटायला येतो....पण आज नाही येऊ शकणार, मला दुसऱ्या एका साईटवर जायचेय. मी उद्या नक्की येतो." असं सराईतपणे बोलत साखर पेरणी केली. "या जी! उंद्या घरीच या! मागल्या टायमाला तुमी वावरातनंच गेलासा ...गरीबाच्या घराला तुमच्या सारक्या म्वोट्या माणसाचं पायतरी लागू द्यात जी..! गावात कुणाला बि इचारा " असं बोलत फोन बंद केला. त्यांच्या या आपुलकीच्या बोलण्याने नीरज मात्र काहीसा गडबडून गेला.....पण क्षणभरंच!! त्याला बॉसचे 'It's an business deal' हे वाक्य लगेच आठवले नि त्याने मनातले विचार झटकले ...व बॉसला ही आनंदाची बातमी सांगायला 'इंटरकॉम' जवळ घेतला...
*******************************************
दुसऱ्याच दिवशी नीरज समीधाचा निरोप घेऊन ऑफिसला न जाता, डायरेक्ट पाडळीकडे निघाला होता. आज बॉसने दिलेली कामगिरी पूर्ण पार पाडून, तो पुन्हा एकदा त्यांच्या विश्वासास पात्र ठरणार होता.'मग बॉस कंपनीच्या सक्सेस पार्टीत माझे सर्वांसमोर नेहमीसारखे तोंड भरुन कौतूक करणार नि लेले, माळी, डिसले आदी माझ्यापेक्षाही सीनियर मंडळींची तोंडं पाहण्यासारखी होणार....' याच विचारात तो होता; आणि असं नित्याचंच झालेलं .....बॉसने एखादे काम द्यावं नि नीरजने ते लिलया पार पाडावं...! त्यामूळे त्याचा 'मूड' खूपच छान होता. त्याने गाडीत पंकज उधासची 'और आहिस्ता.., किजीए बातें' गझल लावली होती. जेव्हा जेव्हा तो खूष होतो तेव्हा तेव्हा तो 'पंकज'च ऐकणं पसंद करतो. एकापेक्षा एक 'अवीट' गझलस् ऐकता ऐकता तो पाडळीत कधी पोहचला हे त्याचे त्यालाच समजले नाही. त्याने गावातल्या पाराजवळ गाडी थांबवली तसे पारावरची मंडळी त्याच्याकडे टकामका पाहू लागली. त्याने जवळ जात त्यातल्याच एका वयस्कर व्यक्तिला संपतराव वाघमारेंचे घर कोठे आहे? असे विचारले. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, "म्हणजे आमच्या रणजीतच्या घरीच नव्हं...!! हे असं थोरल्या वाटंनं सरळ जावा..पुढंच हणमंतरायाचं मंदीर लागंल...गाडी ततंच हुबी कराय लागंल..मंदीराच्या मागल्या आंगालाच हाय..जी. पर पावणं, कोण गावचं म्हणायचं तूमी?" पुण्यावरुन आल्याचं सांगत नीरजने तिथून काढता पाय घेतला. तो अजून तिथं थोडावेळ जरी थांबला असता, तर त्याची पूर्ण मुलाखतच घेतली असती जणू....त्या म्हाताऱ्यानं ! गाडी मंदीराजवळ थांबवली व बाहेरुनच पाया पडत तो मंदीराच्या मागच्या बाजूला गेला. पाठिमागे एक वाड्यासारखं 'कौलारु' घर होतं. बाहेर शेणामातीचा सडा टाकलेलं ऐसपैस अंगण ! अंगणात एका कडेला काही फुलझाडे लावलेली होती व तिथंच एक तुळशी वृंदावन होतं. चार-पाच कोंबड्या अंगणात पिल्लासह दाणे टिपत होत्या. जवळच असलेल्या बदामाच्या झाडावर एक-दोन कावळे बसले होते. ते खाऊ की गिळू अशा नजरेने आईच्या मागे तुरुतुरु पळणाऱ्या कोंबडीच्या पिल्लावर दबा धरून होते. कोंबडी मात्र खमकी होती...दाणे टिपता टिपता तिचा एक डोळा कावळ्यांवर तर दुसरा डोळा पिल्लांवर होता...ते सगळं पाहून त्याला आपल्या गावाची आठवण आली. ते अस्सल 'ग्रामीण' दृश्य पाहतच अंगणात येऊन उभा राहिला.
त्याने संपतरावांना हाक मारली..बऱ्याचवेळानं एक पन्नासीच्या जवळपासची वयस्कर बाई बाहेर आली. नीरजने त्यांना आपली ओळख सांगताच, काहीतरी आठवल्याच्या अविर्भावात त्या म्हणाल्या, "बस् रं लेकरा ! घडीभर .! मला माइत हाय सगळं.. आमचं म्हातारं रानात गेलंय येरवाळीच." नीरज बाहेरचा चौथरा चढून सोप्यातल्या सतरंजीवर येऊन विसावला. तोवर त्या बाईंनी लगबगीने आत जाऊन त्याला पाणी आणून दिले. 'आईपेक्षा थोडं थोरलं वय असेल...' असा अंदाज बांधत त्याने पाणी घेतलं. "म्या त्यांची कारभारीन...रखमा ! 'त्यो' रानाचा ईषय काय म्हाताऱ्याच्या डोस्क्यातनं जाईनाच ! म्या म्हणलं ..आपण इन-मीन दोन त्वोंडं घरात ..कशाला पायजे कोरट-कचरी ..!? आज हाय उद्या नाय ... , तर म्हातारं लय 'कारवानी'..! वाडवडलाची पांढरी म्हणून बसलंय कवटाळून ...!" असं म्हणत म्हातारी आत गेली. आत भांडी वाजल्याचा आवाज येऊ लागला... बहुतेक चूलीवर चहाला आदण....! - 'खेड्यापाड्यातली लोकंच भारी न्यारी..उदारमनाची ! दारात ओळखी-अनोळखी..कोणी पण येऊ द्या ..आलेल्याला... 'या बसा..म्हणंन' नि त्याला 'चहापाणी' करत मग येण्याची चौकशी बैजवारपणे करणे... हीच 'खरी माणसं'...! नाहीतरी आपण शहरी लोकं .... चार पुस्तकं शिकलो ते फक्त नावालाच,स्वयंघोषित 'सुशिक्षित व सुसंस्कृत' असे स्वत:लाच म्हणवून घेणारे....! दारात आगंतूक अनोळखी सोडा ....ओळखीचं जरी 'कोणी' आलं तरी त्याला दरवाज्याच्या 'सेफ्टी होल्' मधून कोणी 'परग्रही' आल्याच्या दृष्टीने चोरुन पाहतो..नि उदार मनानं दार उघडलंच तर..त्याच्याकडून काय? कोण ? कशाला? कधी? ...असल्या 'क' दर्जाच्या कूटप्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत आणि त्याचे आपण काही 'देणं' लागत नाही याची खात्री पटेपर्यंत दारातच तिष्ठत ठेवतो. फायद्याचं आहे ...असं कळलं की, मग मात्र दिलगीरीचा दिखावा करत पायघड्या अंथरतो ...नाहीतर बाहेरच्या बाहेर कटवतो नि शिळोप्याच्या गप्पा मारताना, मारे मोठ्या फुशारकीने सांगतो की, 'मी' आमक्या आमक्याला कसा हुशारीने कटवला,पकवला.....!' असा मनातल्या मनात विचार करत नीरज घर न्याहाळू लागला आणि त्यांची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोवर स्थिरावली ...तो आपसूकच उठून भिंतीजवळ जाऊन निरखून पाहू लागला.... तो फोटो अंदाजे २०-२२ वर्षाच्या तरुणाचा होता..नि त्याच्या अंगावर 'इंडियन आर्मी'चा ड्रेस होता. नीरजने फोटोवरच नजर स्थिर ठेवत...आतल्या बाजूला उद्देशून विचारलं.."आई हा फोटो.....?" तेवढ्यात बाहेर येत रखमाबाई निर्विकारपणे बोलल्या.."हा माझा ल्योक रणजीत ! त्याला मिलटरीचं लय याड .. वाघ हुता जी वाघ..!." - "होता म्हणजे ??" त्यांचं बोलणं मध्येच तोडत अधीरतेने नीरजने विचारले. तर त्यांनी निमूटपणे फडताळातून एक अल्बम व काही बातमीपत्रे नीरजच्या हातात आणून दिली..नि तोंडाला पदर लावत अश्रू भरल्या डोळ्यांनी आत गेल्या. नीरजला काहीच कळेना...
नीरज सतरंजीवर येऊन बसला नि तो अल्बम् पाहू लागला. त्यात रणजीतचे लहानपणीचे, शालेय, महाविद्यालयीन जीवनातील विविध स्पर्धामध्ये बक्षीस मिळवल्याचे तसेच एन.सी.सी.चेही फोटो होते. ते पाहताच नीरजला स्वत:चे शालेय व महाविद्यालयीन जीवन आठवले...! नीरजलाही लहानपणापासून 'मिलिटिरीत'च जायचं होतं...त्यासाठी हायस्कूलला गेल्यावर एन.सी.सी. जॉईन केलं .. तो त्यांच्या कॅम्पचा लिडर होता.. त्याची 'ड्रील'तर इतकी जबरदस्त होती की दरवर्षी १५ ऑगस्टला व २६ जानेवारीला परेडमध्ये तोच सर्वात पुढे असायचा...त्याच्या कमावलेल्या शरीराची 'लयबध्द हालचाल व आर्डरचा पहाडी आवाज'च त्याचे भविष्यातले मनसुबे सांगून जायचा. दहावी झाल्यानंतर तो एक-दोन 'भरती'ला ही उतरला पण तिथे त्यांची उंची आड आली..मग त्याला कोणीतरी सांगितले की, ' एन.सी.सी. - 'सी' सर्टिफिकेट असेल तर, थोडीफार 'सूट' मिळते.' मग त्याने पुढेही एन्. सी. सी. कंटीन्यू करायची ठरवली. एका बाजूला बारावीचा अभ्यास नि दुसऱ्या बाजूला एका स्टेशनरी दुकानात 'पार्टटाईम्' काम करत त्याने एन्.सी.सी.ही सांभाळली.गोवा,डेहराडून अशा अनेक ठिकाणी तो कॅम्पसाठी जाऊन आला. शेवटी 'सी'सर्टिफिकेट मिळवलंच.. !! तो नव्या उमेदीने भरतीला जाऊन उभा राहिला..पण यावेळीही 'सी'सर्टिफीकेट असूनही उंचीमुळे त्याला डावलले गेले. पण त्याने मिळवलेल्या सर्टिफिकेटचा गठ्ठा पाहत तो शिख आर्मी ऑफिसर रडवेल्या नीरजला म्हणाला.. "ओय् ..पुतर.. !! बुरा मत मान । तू अपने देश की सिव्हिलीयन रहकर भी सेवा कर सकता है । एक अच्छा देशभक्त आदमी एक आर्मीवाले के बराबर ही होता, सीर्फ अपना ये 'जुनून और जमीर' मत खोना ।" त्या आर्मीवाल्या शीख अफसरच्या बोलण्यानं नीरज काहीसा सावरला...पण उदास मनानेच घरी परतला...नंतर मात्र आर्मीचा नाद सोडून दिला. इथं तिथं प्रामाणिकपणे काम करत त्याने बी.कॉम पूर्ण केलं नि करियर घडविण्यासाठी तो पुण्यात एका मित्राच्या मदतीने कुलकर्णींच्या कंपनीत दाखल झाला' हे सगळं त्याला आठवलं. तसंच त्या अल्बममध्ये रणजीतचे आर्मीमधलेही फोटो होते. मग त्याने जवळच पडलेले वर्तमानपत्र उघडले; तो पेपर सात-आठ वर्षांपूर्वीचा होता. त्यात पहिल्याच पानावरील एका बातमीने त्याचं लक्ष वेधून घेतले....
'जम्मू काश्मीर मधील कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सात दहशतवाद्यांना कंठस्नान..पण तीन भारतीय जवान शहीद - एक जवान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील' असा तो मथळा होता. नीरज मथळा वाचूनच सुन्न झाला. त्याला सगळा उलगडा झाला. त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंत ती सगळी बातमी धूसर झाली.
त्याला तो परवाचा मोबाईलवर आलेला मेसेज आठवला...
काय विचित्र अवस्था आहे पहा ना..
तो "कुलभूषण जाधव" तिथे एकटाच पाकिस्तानी जेलमधे फाशीच्या शिक्षेची वाट पहातोय आणि आपण मात्र
मजा मारतोय......
त्याला तिथे तुडवून मारत असतील
तुम्हीं आम्ही स्वत:च्या आयुष्यात व्यस्त...
फक्त कुलभूषणच्या आईला, वडीलांना, बायकोला, मुलाबाळांना अन्नाचा घास घश्याखाली उतरत नसेल, झोप येत नसेल....
आता ते कसाबकरीता मध्यरात्री न्यायालय उघडायला लावणारे वकील कुठे गेले? साधा वकील द्यायलाहि नकार दिला त्याला पाकड्यांनी,
आजादि, मानवता म्हणून ओरडणारा तो कन्हय्या कुठे गेलाय? एकहि पाकिस्तानी मानवता म्हणून ओरडत नाहिये,
कुठे गेलाय सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारा केजरीवाल?
पाकिस्तानकडे एकहि पुरावा नसताना कुलभूषणला फाशी सुनवलीय, कुठे गेलाय पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट काढणारा करण जोहर आणि त्याच समर्थन करणारे ते सगळे शहाणे?
मुंबईवर हल्याची केस अजूनहि निकालाविना पडलीय आणि कुलभूषणला लगेच फासावर टांगायला निघालेत,
कुठे गेलेत सगळे?????
या देशात आरक्षणाकरीता मोर्चा काढता ना मग एक मोर्चा कुलभूषणकरीतापण काढा ना कि त्याला फासावर लटकवल्यावर मेणबत्त्या लावणार आहात?
उठा जगाला कळू द्या हिंदुस्थान काय ताकतीचा देश आहे...
कुलभूषणला वाऱ्यावर सोडलत तर कितीतरी आई—वडिल आपल्या मुलामुलींना संरक्षण दलात पाठविणार नाहित...
सरकारला लिहा, मोर्चा काढा, जे जे जमेल ते ते करा
पण कुलभूषणला परत आणाच.
"कुलभूषण जाधव" हे पाकिस्तान मधून सुटावे।
या साठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा।
मराठी व्यक्ति साठी
सर्व मराठी व्यक्तिंनी एकत्र यावे.
असा तो मेसेज !! 'मी ही किती पोटतिडकीने तो पुढे शेअर केला होता..पण ती 'पोटतिडीक' फक्त 'वॉट्स अप' च्या 'स्क्रिन'पूरतीच मर्यादित राहिली; कारण प्रत्यक्षात मी काय करतोय....त्या बिचाऱ्यांच्या माझ्याच वयाच्या'पोटचा गोळयाने' या देशासाठी,आपल्या प्रत्येकासाठी हसत हसत मृत्यूला कवटाळले....पण अशा दु:खातही परमेश्वराने दिलेल्या जीवनाचा अव्हेर न करता,मुलाच्या आठवणींसह ते आपले एकाकी जीवन कंठत आहेत आणि त्यांना आधार द्यायचं सोडून उलट झुंजाररावांसारखी माणसे छळत-फसवत आहेत नि त्या कामात पैशांसाठी माझा बॉस व मी मदत करतोय....'यांची त्याला जाणीव झाली. थोड्यावेळापूर्वी बदामाच्या झाडावर टपून बसलेल्या त्या कावळ्यांच्या जागी तो झुंजाररावांना, आपल्या बॉसला व स्वत:लाही पाहू लागला....मनात चाललेल्या त्याच्या या 'विचार उत्थाना'ने तो पूरता भांबावून गेला होता. क्षणात त्याला त्या 'शीख' मिलिटरी ऑफिसरचे वाक्य आठवले.. आणि तो ताडकन उठला.....
रखमाबाईंनी केव्हाचा चहा बाहेर आणून दिला होता पण विचारांच्या तंद्रीत त्याला चहा पिण्याचे भानच राहिले नव्हते. एका शूराची 'शूर आई' आपल्या वाघाच्या आठवणीत चूलीच्या पुढ्यात बसून रडत होती...कारण ती खरोखरच रडत नसून, पेटत्या चूलीतल्या धूरानं डोळ्यातून पाणी येतंय हे भासवण्यासाठी....! त्या आईशी बोलण्याचं त्याला धाडस होईना म्हणून काहीच न बोलता त्याने गुपचूप पायात शूज् चढवले ...नि बाहेर पडला. गाडी चा आवाज ऐकून रखमाबाई बाहेर धावत येऊन म्हणाल्या..."ए लेकरा ..! कुठं चाललास .....तेवढा 'च्या'तरी घेऊन जा.." पण नीरजचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.
नीरजने गाडी सरळ संपतरावांच्या शेताकडे वळवली. गाडी थांबवून तो शेताकडे निघाला. आज त्याला आपल्या 'इंम्पोरटेड शूज'ची काळजी वाटत नव्हती. संपतराव भर उन्हात घाम्याजलेल्या अंगाने शेतकामात गढून गेले होते. नीरज जवळ गेल्यावरच त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याला पाहताच 'रामराम घालत' त्यांनी "म्या तुम्हास्नी बोलावलं व मीच हतं कामात गुतून पडलो जी...मला आठव नाही रायली जी...माप करा सायब!! म्या लय ईचार केला ..आणि म्हातारी बि म्हणली ...आता आपल्याला काय जमायचं नाय सगळं श्यात कसायचं ..तर शेजारधरमाचा वाद मोडून ईकुन टाकू ती जमीन ...म्या तयार हाय जी जमीन ईकायला...तूमी बघा जी ..झुंजाररावांना बोलून ...तुमी मला माझ्या रणजीत सारखंच ....तुमीच काय ती ठरवा ..." असं घोकून पाठ केल्यासारखे सगळे एका दमात बोलले.पण नीरजचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हतेच...! तो पार त्यांच्याजवळ गेला नि चटकन पायावर डोकं टेकवले..संपतरावांना साहेब असं का करतायत काहीच कळेना....नीरजच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, " बाबा ..आपली जमीन नाही विकावी लागणार " आणि तो संपतरावांच्या त्या वाडवडिलांच्या 'पांढरी' तून ताड् ताड् लांबच लांब पाऊले टाकत गाडीकडे निघाला. संपतराव गोंधळून जाऊन तिथंच बसून राहिले होते..नि त्यावेळी नीरजची गाडी वेगाने पुणे जवळ करीत होती.
गाडीत आवडीचे गाणं त्याने अगदी जोरात लावलं होतं...पुण्यात ऑफिसच्या आवारात त्याच्या गाडीने प्रवेश केला, तेव्हा ऑफिस सुटलेलं होतं....आपल्या केबिनमध्ये जाऊन त्यानं एका कागदावर काहितरी खरकटले व नीरज शांत व प्रसन्न मनाने बाहेर आला; तो कागद आणि गाडीची चावी 'सिक्यूरीटी गार्ड'च्या ताब्यात दिली आणि तो पायीच घराच्या दिशेने जाऊ लागला....दिवे लागणीची वेळ झाली होती..... एक-एक करत रस्त्यावरचे दिवे अंधार भेदून प्रकाश फाकू लागले.... नीरजनेही आज जणू 'अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी जीवनरुपी रस्त्याला 'यू टर्न' मारत आपल्या मनाशी वेगळीच 'डील्' केली होती... नि त्याच्या कानात फक्त एकच वाक्य घूमत होतं -
'तू अपने 'देश' की 'सिव्हिलीयन' रहकर भी सेवा कर सकता है । एक अच्छा देशभक्त आदमी एक 'आर्मीवाले' के बराबर ही होता, सीर्फ अपना ये 'जुनून और जमीर' कभी मत खोना ।'
- 'स्व' 🖋️
Comments
Post a Comment