चिक्कीवाला - एक असामान्य व्यक्तिमत्व

        ऐन भाऊबीजेच्या दिवशीच एका स्नेही मित्राने वास्तुप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला होता;पण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते म्हणून मी सकाळी लवकर उठून लोणंदला जायला ९.५०च्या सह्याद्रीसाठी भिलवडी रेल्वेस्टेशनवर पोहोचलो. ट्रेन आपल्या भारतीय परंपरागत अलिखित रीतीप्रमाणे तब्बल २०मिनिटे उशीराने न पोहोचता वेळेवर आली असती तर धक्काच बसला असता...पण गाडीने तो अघटीत प्रमाद केला नाही...असो! प्रवाशांची बरीच गर्दी होती..टाचा उंचावून लोक गाडी येणाऱ्या दिशेला व तीच्या विरुद्ध दिशेलाही पाहत होते....ते पाहून मनातल्या मनात हसू आलं. हिवाळा सुरू झाल्यानं हवेत थोडा बोचरापणाही जाणवत होता. मी एक बाकडं धरुन बसलो. तिथं एक आजोबा अगोदरच बसले होते. मी त्यांना 'जनरल' डबा कुठं थांबतो?, असं सहज विचारलं नि आमचा संवाद सुरू झाला. त्यांनी रेल्वेच्या टायमिंगपासून कुठला डबा कुठं थांबतो-  अगदी C1 इथं, B1 त्या लिंबाच्या झाडापासून पाठिमागे...., जास्त गर्दी कुठल्या डब्यात असते,आणि गर्दीमुळे आपण रिझर्व्हेशन डब्यात चुकून बसलोच व यदाकदाचित टिसी आलाच तर तो काय म्हणतो ...त्याच्या बोलण्यावर आपण काय प्रत्यूतर द्यायचं , वगैरे वगैरे सगळी इत्यंभूत माहिती बैजवार सांगितली...नि ते ऐकून मलाही बरं वाटलं....एवढ्यात 'ट्रेन आली', असं कोणतरी ओरडले...तसे सगळे उठून हातघाईच्या लढाईला सामानसुमान घेऊन तयार..!!


     मी त्या आजोबांबरोबरच मुद्दाम थांबायचं ठरवलं होतं ...ढकलत  ढकलत कसंबसं वर चढलो. आतले प्रवासी उगीचंच ऐसपैस पसरुन बसल्यासारखे वाटत होते... कदाचित 'सरकून बसा' म्हणतील म्हणूनच!! ... कोणतरी परग्रही आल्यासारखे पहात होते...असं सगळीकडेच घडतं.. मग ती रेल्वे असो की एस.टी. !! विमानात पण असंच घडत असेल का ?? हा प्रश्न मनाला स्पर्शून गेला....ट्रेनचा शाही भोंगा वाजला नि झाडं, इमारती, हात हलवणारी माणसं मागं पडू लागली....

      

      ते आजोबा बसण्यासाठी इकडं तिकडं बघत होते. पण त्यांना कोणच दाद देत नव्हते. कोण झोपेचं सोंग घेऊन  तर कोण पेपरमध्ये तोंड खुपसून बसले होते. मग आजोबा सीटच्या वरती असलेल्या बर्थ वर नजर टाकत मनाशी काहीतरी ठरवत कसंबसं लटकत सरळ वर चढून गेले ; त्यांची ती उतारवयातली कसरत बघून डब्यातल्या बायका तोंडाला पदर लावून फिदीफिदी हसल्या नि आजोबांचा चेहरा कच्चं कारलं खाल्ल्यासारखा झाला.... वर अगोदरच एक तरुण अजगरासारखा जागा अडवून पसरला होता. आजोबांनी आपल्या पार्श्वभागाचा वैकल्पिक वापर करत बसण्यापुरती जागा बनवली व हुश् केलं. त्यांची ही कसरत मीही पहात होतो.. आता मात्र अगोदरच जागा अडवून बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले; कारण आता नविन कोण येऊन त्यांना जागेसाठी विनवणार नव्हतं ना!!! मग मीही त्या आजोबांचा कित्ता गिरवायचं ठरवलं. त्या आजोबांच्या विरूद्ध बाजूच्या बर्थवर चढण्यासाठी मी पुढे सरसावलो तसं त्या बर्थखालील सीट वर बसलेली बाई ओरडली, "अहो वर अगोदरच एक जण झोपलाय ..त्याच्या अंगावर बसता की काय?, मी तीचा कावा ओळखला,(कारण ती बाई त्या वर झोपलेल्या माणसाच्या जागेवर बसली होती, मी जर त्याला उठवलं तर तो खाली येऊन बसू शकणार होता व तीला उभं रहावं लागणार होतं म्हणून त्या भीतीने ती आकांडतांडव करत होती..हे नंतर तंतोतंत खरं झालं ) - "मला फक्त वर चढण्यासाठी पाय ठेवण्यासाठी जागा द्या, मी बघतो काय करायचं ?! असं तीच्यापेक्षा जरा चढ्या आवाजात बोललो तसं ती माऊली वरमली....मी इथंही आजोबांसारखी बसण्यासाठी जागा बनवली व बसलो. 

       

           ट्रेन एका लयीत इकडं तिकडं हलत डुलत चालली होती. लोकही हलत डुलत एकमेकांशी बोलण्यात गुंतले होते. मी हेडफोन्स लावून गाणी ऐकण्याचा प्रयत्न करत होतो पण लक्ष लागेना...मग सरळ हेडफोन्स काढून ठेवले. व डब्ब्यामध्ये सहज एक चिकित्सक नजर फिरवली..तशी एक-दोघं कॉलेजवयीन पोरं डब्ब्यातल्याच एका  'प्रेक्षणीय स्थळा'वर अर्थात सुंदर मुलीवर लाईन टाकत उभे होते. मग मला टाईमपाससाठी कारण मिळालं. कदाचित माझा गैरसमज असेल पण मला लगेच समजतं की, कोण कुठल्या टॉवरची रेंज पकडण्याचा प्रयत्न करत असतं ते.....ती गौरवर्णी, केस मोकळे सोडलेली मुलगीही बोलता बोलता चेहऱ्यावर येणाऱ्या बटा सावरत,  त्या  मुलांना अधुनमधून सिग्नल देत होती आणि त्या मुलांच्या तोंडावर स्वर्गीय सुखाचा भास होत होता...... आणि मला त्यांचं निरीक्षण टिपायला जाम मजा येत होती.

    

        ट्रेनने एव्हाना किर्लोस्करवाडी सोडलं होतं नि नेहमीप्रमाणे चणे-फुटाणे, भेळवाले, समोसेवाले आदी फेरीवाले येण्यास सुरुवात झाली. मगाशी जे लोक अनोळखी होते तेच लोक आता एकमेकांना खाद्यपदार्थ खाण्यासाठी देत-घेत आग्रह करत होते. मनुष्य स्वभावाच्या अनेक छटा एकावेळी अनुभवायास येत होत्या.मग कराड स्टेशन आलं नि डब्यात आणखिन गर्दी वाढली अन् परत गाडी सुटली... त्या गर्दीत दगडी चिपळ्या नि हातातल्या काठीच्या सहाय्याने ठेका धरणाऱ्या, सुरेल आवाजाची श्रीमंती लाभलेल्या एका अंध व्यक्तीची व दुर्दैवानं 'ना धड तळ्यात - ना धड मळ्यात' अशी अवस्था असलेल्या तृतीयपंथीयांचीही प्रवाश्यांव्यतिरिक्त भर पडली. एक दोघे तर इतके विलक्षण देखणे होते की, माझ्यासह कित्येकांच्या चोरट्या नजरा त्यांना हव्या 'त्या' ठिकाणी क्षणभर विसावल्यात ;  हे त्यांच्या सराईत नजरेनं हेरलं.  मग वेडेवाकडे अंगविक्षेप करत, टाळ्या वाजवत खंडणी मागितल्याच्या आविर्भावात पैसे उकळून निघून गेले.....काहींनी नाराजीने तर काहींनी चक्क आपणहुन पैसे देऊन सोबतच्या छोट्या मुलांना आशिर्वाद द्यायला सांगितले...पण ज्यांना देण्यासाठी देवानंही हात आखडता घेतला आहे त्यांच्याकडूनच धडधाकटांनी चार दमडीच्या बदल्यात आशिर्वादांची अपेक्षा धरणं विरोधाभासी,आपस्वार्थी किंबहुना केविलवाणं वाटलं. पण ज्याला खरी मदतीची गरज होती त्या सुरेल गाणाऱ्या अंध व्यक्तीच्या हातावर एक दोन रुपयांचं नाणं टेकवायला कुणाचे हात धजावले नाहीत आणि असं होऊनही त्या अंध व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक रेषभरही फरक दिसला नाही..तो ठराविक ठेक्यात काठी आपटायचा नि पुढे सरकायचा... आणि तसंही यापेक्षा तो वेगळं काही करु शकणार होता म्हणा...!!?? 

      

          मसूर स्टेशनला गाडी थांबली  आणि तोंडाचा चंबू करत विशिष्ट लकबीत 'चिक्की चिक्की लोणावला चिक्की' असं ओरडत  एक इसम डब्यात शिरला.  तो गर्दी बघून तोंड वेडावत म्हणाला,"काय लोकं हाय..!! मागचा डबा खालीच हाय, आन् तुमी सगळी इथं कोंडवाड्यात बसलाय..!" ते ऐकून त्या गर्दीत नुकताच चढलेला एक तरुण मुलगा म्हणाला," तो डबा रिझर्व्हेशनवाला आहे?". चिक्कीवाला छद्मी हसत म्हणाला, "कशावरून ??? रिकामा हाय म्हणून का!?? म्हणून लय शिकायचं न्हाय.... आणि म्हणून मी आठवीतनंच शाळा सोडली.." त्याचं हे बोलणं ऐकून सगळा डबा गडगडून हसला...यावर चिक्कीवाला पुढं म्हणाला,"आवं होय तर, लय शिकलं की लोकं नको तिथं , नको तितकं डोकं चालवत्यात....आवं, मी रोज लोणंद ते कराड व परत कराड ते लोणंद अशा दोन न् दोन चार फेऱ्या मारतो ...रोजचं हाय मला हे....लोकांना वाटतं डबा रिकामा हाय तर रिझर्व्हेशन आसंल ..तर तसं काही नसतं ... आणि समजा असलाच व टी.सी.आलाच तर 'पुढच्या स्टेशनाला उतरतो' असं सांगायचं ..झालं ! आणि परत तो तर कशाला कडमडतूय!!??" ...त्याचं हे बोलणं बऱ्याचजणांना पटल्यासारखं वाटलं.  त्या तरुण प्रवाशानं त्या चिक्कीवाल्याची फिरकी घ्यायचं ठरवून विचारलं बहुतेक..." तुमची मजा हाय की , रोज ट्रेनमध्ये बसायचं फुकाट आणि पैसे पण रग्गड कमवायचे..." यावर तो चिक्कीवाला म्हणाला, " देवा! कसली मजा!?? मी कामगार हाय, मला २०%कमीशन हाय, शंभराचा माल इकला तर मला २० रुपये, १०००/- चा इकला तर मला २००/-रु. असा साधा हिशोब हाय. पण 'लोणंद ते कराड' एका  फेरीला दोन तास लागतात .. आणि या दोन तासात अजिबात बसायला मिळत नाही, गर्दीत वझं घेऊन उभंच रहावं लागतं. परत दोन तास तिथं कराड स्टेशनवर थांबायचं , मग दुसऱ्या गाडीने परत 'कराड ते लोणंद' दोन तास उभं राहून धंदा करायचा..असं चार फेऱ्या म्हणजे आठ तास काम होतं पण सोळा तास गुतावं लागतं..कारण प्रत्त्येक फेरीनंतर मला दुसऱ्या गाडीची दोन तास वाट बघावी लागती.... आणि ही अशी गर्दी!! या गर्दीत चार-पाच चिक्कीची पाकीटं कुणी मारली तर ते पैशे माझ्याच 'बोकांडी' बसत्यात " हे असं एवढं एका दमात सांगून तो एकाएकी शांत झाला...तो जरी रोजच धावत्या ट्रेनमध्ये असला तरी त्याचं जगणं ट्रेन आणि दोन स्टेशन यात अडकलं होतं....मग थोड्याशा अवकाशाने तोच हसत बोलू लागला," आवं...पण आपलं जगणं नो टेन्शन... रात्री आंग टाकल्या टाकल्या 'ढाराढूर पंढरपूर'!! नाही तर तुम्ही शिकली सवरली माणसं ..ढीगभर पैसं कमवूनही गाढ झोप लागत नाही म्हणून दवंखान्याचं उंबरं झीजवता...". त्याचं हे सरळसोट रोखठोक तत्त्वज्ञान ऐकून मी चाटच पडलो . किती वास्तव तो सहजच बोलून गेला होता तो.....मीच काय सगळा डबा आता त्याच्याकडे कौतुकानं पहात होता...एवढ्यात त्या तरुणाने खिशातून विमलची पुडी काढली आणि मोठ्या तोऱ्यात विशिष्ट लकबीत दोन पुड्यांचं मिक्सिंग करु लागला...ते पाहून चिक्कीवाला म्हणाला, " अरं भावा!, असला नाद सोड ...व्यसनं आमी अडाणी माणसांनी केली तर ते एक ठिक ....पण तुझ्यासारख्या शिकलेल्या पोरांनी जाणून बुजून ईखाची परीक्षा का म्हणून घ्यायची??!! कॅन्सर हुतो त्येनं....मी बघ चाळीस वय माझं ...दोन पोरं हायती मला ...पण मला साधं सुपारीच्या 'खांडाचं' व्यसन न्हाय मला....मग दारु जुगार तर लांबच!"  त्याचं हे बोलणं ऐकून तो तरुण जरासा वरमला पण त्यानं बेदरकारपणे पुडी मान वर करून तोंडात सोडली व 'फूऽऽ ' करुन मोठ्या स्टाईलने गुटख्याच्या भुकीचा धुवा उडवला .....! आता मात्र सर्वजण त्या सामान्य चिक्कीवाल्याकडं आदराने बघत होते...चिक्कीवाला पुढं म्हणाला, "अरं नाद करायचा तर कुस्ती , यायामाचा करा‌.....खायचंच तर बदाम ,काजू , गुळ-शेगदाणं खा, प्यायचंच तर दूध -ताक प्या ......." त्याचं हे बोलणं ऐकून तो तरुण आता मात्र लाजीरवाणा चेहरा करून उगाचंच खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न करु लागला... 

      

       एवढ्यावर  थांबेल असा तो 'चिक्कीवाला' नव्हताच मुळी!!, वेगळंच 'रसायन' होतं जणू!  त्यानं आपल्या पिशवीत हात घालून दोन तीन चिक्कीची पाकीटं बाहेर काढून  फोडली व  त्याचे एक एक तुकडे सर्वांना आग्रहाने खायला देऊ लागला....अगदी त्या सुंदर प्रेक्षणिय स्थळालाही 'नाही होय' करत  चिक्की खायला घातली....पण त्या गुटखा खाणाऱ्या तरुणाने मात्र चिक्की खाण्यासाठी तोंडातला गुटखा काही थुंकला नाही...एवढ्यात तो चिक्कीवाला ओरडला, "चला ...! कोरेगाव आलं....". माझ्या मनात काय विचार आला माहित नाही पण मी माझा हात अभावितपणे मोबाईलकडे गेला नि मी गडबडीत खाली उतरून  त्या सामान्यातल्या असामान्य अशा 'चिक्कीवाल्या'चा फोटो काढला. तेवढ्यात ट्रेनचा वेग कमी झाल्याचं पाहून तो चिक्कीवाला उडी मारुन दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी गर्दीत नाहीसाही झाला ...मला त्याचं नाव जाणून घ्यायचं होतं ...पण ते राहुनच गेलं. तो निघून गेल्यावर मात्र डब्यातलाच शेजारचा एक सुशिक्षित चांगलं चार चौघांना ऐकायला जाईल अशा आवाजात आपल्या बायकोला म्हणाला,  "अगं काय नाही गं.....अशी माणसं खूप 'चॅप्टर' असतात, लोकांची आपल्याला सहानुभूती मिळावी , लोकांनी 'चांगलं' म्हणावं म्हणून चांगलं बोलत असतात, 'इ मोशनल ब्लॅकमेल' करत असतात..." हे ऐकलं नि मला त्या चिक्कीवाल्याचे बोल आठवले..." शिकली सवरलेली माणसं नको तिथं ,नको तितकं 'डोकं' लावत्यात." 



थोडंसं मनातलं -


सामान्यांतही असामान्यत्व दडलेलं असतं...कधी कुणाला चालण्या- बोलण्या, राहण्यावरुन  कमी लेखू नये...शिक्षण तर सगळेच घेतात पण त्या प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी कोण कसा सांगड घालतो यावरच त्याचं जीवनमान अवलंबून असते. आणि सर्वात महत्वाचे व्यसनं करु नका व इतरांनाही त्यापासून परावृत्त करा...! धन्यवाद!! 

             

    

           

Comments

Popular Posts