सटवीचा लिखा !
"आईग् आ....आह्....ऊं.....आ...ई...खूप दुखतंय गं ...आह् ..स्स्...!!" - अचानक 'डिलीव्हरी पेन्' तीव्र झाल्याने पूजा विव्हळत होती. तशी EDD अजून चार दिवस पुढे होती, तोवरच तीला कळा सुटल्या होत्या. तीचा तो आवाज ऐकून घाबरं होऊन, तीची आई (वत्सलाबाई) किचनमधून धावत आली. बेडवर वेदना असह्य होवून, हात-पाय झाडत चाललेली पोटच्या गोळ्याची ती 'तगमग' पाहून त्या माऊलीचा जीव भेदरलेल्या हरणीच्या काळजाचा झाला. तीने पूजाला धीर देत मोबाईल घेऊन पूजाच्या पप्पांना (नाना)कॉल लावला- "अहो...मी बोलतेय, कुठे आहात ?दोन-चार दिवस फिरायला नाही गेलं, तर तुमची शुगर काय आभाळाला जावून टेकणार नाही !! लवकर घरी या ... पूजाच्या पोटात दुखायला लागलंय ...कळा सुटल्यात... ... हो..!, मी करते जावईबापूंना फोन ..तुम्ही या ..आता तिथूनच गोळ्या नका हाणत बसू."
नाना (रामभाऊ) रिटायर आर्मीमॅन ! चांगलं शेतकरी कुटुंब. वडिलार्जीत दहा-बारा एकर शेती म्हणून पंधरा वर्षांनी पहिला करार पूर्ण झाल्यावर लगेच 'व्हालंटरी रिटायरमेंट' घेतली; नाही तर आज बऱ्याच वरच्या पोस्टवर असते ! त्यांना दोन अपत्ये- थोरली पुजा आणि धाकटा राहुल. गावाकडे आल्यावर त्यांनी पुजाचे 'दोनाचे चार हात' करायचे ठरवले. पुजानं नुकतंच जिल्ह्याच्या 'लॉ कॉलेज' मधुन लॉ.कमप्लीट् केलं होतं. लवकरच एक चांगले स्थळ चालून आलं कोल्हापुरचं. मुलगा (अविनाश) एका खाजगी कंपनीत इंजिनिअर होता. नाकीडोळी नीटशी,देखणी, मध्यम बांधा नि निमुळती हनुवटी असलेली लाघवी पुजा त्याला बघता क्षणी आवडली. औपचारिक एक-दोन बैठकी होताच लग्नाचा बार उडवून दिला होता; नानांनी आपल्या लाडक्या लेकीचा !! आणि लग्न होऊन तब्बल आठ-नऊवर्षांनंतर व्यवसायाने वकील असणारी पुजा 'प्रेग्नंट' होती व आता रितीप्रमाणे पहिल्या बाळंतपणाला 'माहेरी' आली होती. आपल्याकडे मुलीने पहिल्या बाळंतपणाला माहेरी येणं म्हणजे खूप अप्रूप...!! कितीही हालाखीची परिस्थिती असली तरी प्रत्येक आईबापाला आपल्या लेकीचं 'पहिलं बाळंतपण' आपल्याकडेच व्हावं असं वाटत असतं.त्यात इथे पूजा तर नऊवर्षांनी आई बनणार होती. तीच्या 'स्त्री'त्वाला आता खरं पूर्णत्व मिळणार होतं....गेल्या तीन-चार वर्षांपासून सासरची मंडळी,शेजारी-पाजारी अगदी माहेरातलेही पूजाच्या अपरोक्ष आपसांत 'त्या' बाबत कुजबुजायचेही.....तेव्हा आता सर्वांची तोंडे आपोआपच बंद होणार होती; मग पूजाच्या माहेरी सगळं हौसेने केलं जाणारच ना...! अविनाश सुरुवातीला पूजाला माहेरी सोडण्यास राजी नव्हताच ...पण दोन्ही घरच्या लोकांनी त्याला समजावले तेव्हा कुठे त्याने पूजाला माहेरी जाण्यास परवानगी दिली होती.....
नानांनी पारावरुन खाली उडी मारली आणि 'आता माझं उशीरा का होईना पण प्रमोशन होणार गड्यांनो !!' असं म्हणत मित्रमंडळींचा निरोप घेतला. मागून मित्रमंडळीतला एकजण म्हणाला, "अय्य नानाआजोबा ! मळ्यात पार्टी फिक्स् ....बर का??!" यावर नाना 'ओली-सुकी' दोन्हींची सोय होईल, अशा अर्थाने हातवारे खुणवत घराच्या दिशेने झपझप निघाले ...
घरी गेल्यावर पूजाची तडफड बघून त्यांचाही जीव चरकला. पोट बरचसं खाली सरकलं होतं. बराच गोतावळा जमला होता. नानांची म्हातारी चुलती 'रखमाक्का' पूजाच्या पोटाकडे पहात तीच्या आईला म्हणाली, "वचे, पोरीचं प्वॉट खाली सरकायला लागलंय...लवकर दवंखान्यात न्यायला पायजे". राहुलने दारात 'जीप्सी' तयारच ठेवली होती. वत्सलाबाईंनी दवाखान्यात आवश्यक ते सगळे कपडे - जुन्या सुती साड्या पासुन बनवलेली व अगोदरच स्वच्छ धुवून ठेवलेली 'धडपी', कमरेला बांधायचा कापडी पट्टा, एक-दोन गाऊन, कानावर बांधायला रुमाल, कानावर जास्त आवाजाचा ताण येऊ नये तसंच वात होऊ नये म्हणून कानात ठेवण्यासाठी कापसाचे औषधीयुक्त पीचू, एक-दोन ग्लास,थर्मास, एखाद् दुसरं ताट असं बरंच काही बारीकसारीक एका भल्या थोरल्या पिशवीत कसंबसं कोंबून ती नानांना आणून दिली. नानांनी ती सशाच्या पायांनी जलद जाऊन गाडीत व्यवस्थित ठेवून दिली. रखम्माक्का आणि वत्सलाबाईंनी पूजाला हाताचा आधार देऊन उभं केलं....
शेजारच्या बायाबापड्या गोळ्या झालेल्या... कुणी पूजाला धीर देत होतं; तर कुणी 'कुठल्या दवाखान्यात नेणार? हे चौकशी करुन, अमूक अमूक डॉ.लय चांगला.. तिकडं न्यायला पाहिजे...,लगीच मोकळा करुतू बाईला, त्येचा हातखंडाच लय भारी' असं आपलं मत सांगत होते. ज्यांना जसा अनुभव आला होता, त्यानुसार ते डॉ.च्या कौशल्याची सुई वर खाली करत होते. वाकळ्याची सीताई म्हणाली, "ती सरकारी दवंखान्यातली देशपांडी डागदर लय चांगली, माझ्या दोनी प्वोरीची तिथंच डिलवरी झाली आणि ती बि नारमल !! दोन-तीन तासांत बाळं घेऊन उड्या मारत घरला ..... !" ते ऐकताच तशा अवघडलेल्या दुखण्या अवस्थेतील पूजासह इतर सगळी मंडळीही खळखळ हसली. पण रखम्मांका म्हणाली, "सरकारी दवंखान्याचा काय नेम न्हाय ... .. ध्यानंच देत नाहीत पेशंटाकडं." तशी खालच्या आळीतली सुताराची हौसाई गर्दीतून वाट काढत समोर येऊन पूजाच्या तोंडावर आपला खरमुडा थरथरता हात फिरवत म्हणाली, "पूजे कळ सोस कळ!! बाईचा जलमच लय वंगाळ ! अगं माझ्या धाकल्या प्वोराच्या टायमाला घरात कोणबी नवतं...आण मी मोकळी झाली....पण शाप घाबरली न्हाय...सोत्ताच्या हातानं नाळ तोडली आण एका सुतळी चऱ्हाटानं गाठ मारली! तवा घाबरु नगंस" आणि वत्सलाबाईंकडे बघत पुढे बोलली, "पोर पिवळी पडल्या म्हंजी 'बरफी'च हाय जणू !" तोवर रखम्मांका उसळुन म्हणाली, "आगं हौशे, प्वोटाचा घेर तरी बघ.....प्वॉर हुणार प्वॉर...! लावतीस शरयत !??" त्या दोघींचा वाद मध्येच तोडत वत्सलाबाई म्हणाल्या, "मामी ! मुलगा-मुलगी समानच....कायपण होऊ दे,पण आपली पोरगी तेवढी सुखरूप सुटू दे..!" हे ऐकताच पूजानं चमकून आपल्या आईकडे कौतुकाने पाहिलं.. 'यातून मी काय आता वाचत नाही' अशी धारणा होऊन घाबरुन गेलेल्या जीवात हौसाई व आईच्या शब्दांनी आता धीर आला होता.
नानांनी घरगड्याला सांगून कालच शिवारातील लव्हाळीचा भलामोठा 'भारा' आणून परसदारी ठेवून घेतला होता, तो गाडीत पसरुन त्यावर एक सतरंजी टाकायला सांगितली....तोवर अविनाशचा फोन आला.. नानांनी मोबाईल पूजाच्या कानाला लावला...नवऱ्याचा आवाज ऐकून ती अजूनच मोठं-मोठ्यानं रडू लागली....
- "पूजा बि ब्रेव्ह... तू घाबरु नको मी निघालोय....देवाचं नाव घेत शांत रहा" यावर पूजा म्हणाली, "माझी काळजी करु नकोस.. सावकाश ये तू ..गाडी हळू चालव..सेफ्टी बेल्ट लाव ...." हे ऐकून अविनाश हसत हसत म्हणाला, "ये गप् !! एवढी अवघडलीय तरी 'लेक्चर' द्यायचं काय सोडू नकोस...हं! " मग पूजाला पण हसू आलं, पण त्यानं पोटाला वढ बसली आणि जोराची कळ आली तशी ती परत हसता हसता रडू लागली... "पिल्लू काळजी घे, स्वत:ची आणि आपल्या बाळाची..आय् लव्ह यू " असं अविनाश बोलत होता.. तेव्हा मोबाईल नानांच्या कानाला होता. "जावईबापू ! आम्ही आता निघू का दवाखान्यात?" असं नानांनी विचारलं तसं सासऱ्यांचा आवाज ऐकताच गडबडून अविनाशने न बोलताच कॉल पटकन कट केला....पण नाना मनोमन सुखावले...'आपली पूजी लय भाग्यवान, एवढा जीव लावणारा नवरा मिळालाय' असं मनातल्या मनात म्हणंत गाडीत समोरच्या सीटवर जाऊन बसले..-
पूजाही एक-दोघींच्या मदतीने मागच्या बाजूला तयार केलेल्या बिछान्यावर जाऊन कशीबशी टेकली.वत्सलाबाई व रखमाक्काही तीच्या शेजारी धीर देत बसल्या.....कळा वाढतच चालल्या होत्या...पोटात बाळाची हालचाल जाणवत होती...आणि राहुलने गाडी तालुक्याच्या दिशेने वळवली होती.....
**********************************
पूजाला दवाखान्यात ॲडमिट करुन घेतलं गेलं. नर्सने पोट व बी.पी.वगैरे चेक केले नि वरतीच रहात असलेल्या डॉ.ना इंटरकॉम करुन 'ईमरजंसीकॉल' केला.... व ती बाकीच्या तयारीला लागली. डॉक्टर तातडीने आल्या नि एकंदर परिस्थिती पाहता पूजाला O.T. मध्ये घ्यायला लावले तसे नानांसह सगळे घाबरले .. थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर आल्या..त्यांनी नानांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. नाना घाबरतच आत प्रवेशले -
डॉक्टर म्हणाल्या, "हे पहा ..'केस' एकदम क्रिटकल आहे..बाळानं पोटात 'शी' केलीय नि ते बाळासाठी व आईसाठीही धोकादायक आहे ...आपल्याला 'सिझेरीयन' करावं लागेल." ते ऐकून नानां एवढे मिलिटरीमॅन पण तेही घाबरून गेले... भूतकाळात पूजाच्या लहानपणी एकदा पायात काटा मोडला होता तेव्हा तीची तडफड पाहता पाहता, थरथरत्या हाती सुईने काटा काढताना ते स्वत: रडत होते, तो क्षण आठवला...नि डोळ्यात आसवं गोळा झाली....त्यांची ती स्थिती पाहून डॉ.म्हणाल्या, "तुम्ही बाहेर जा..त्यांचे मिस्टर आले असतील तर त्यांना लगेच पाठवून द्या ...आपल्याकडे जास्त वेळ नाही.."
नाना जड अंतःकरणाने उठले व बाहेर आले तेव्हा सगळे त्यांच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.त्यांनी सगळं थोडक्यात सांगितले नि डोकं धरून बाकड्यावर बसले..ते ऐकताच रखम्माका म्हणाली, "अरं नाना ! ह्यो डागदरचा डाव असतूय...लोकास्नी भ्या घालायचं आण आपरेशन करुन प्वॉर बायर काढायचं....म्हंजी त्येंचं बिल वाढतं....पैक्यासाठीच सारा ख्योळं...!" त्या वाक्यासरशी चमकून नानांनी फक्त वरती बघेपर्यंत.. रखमाक्का डॉक्टरच्या केबीनमध्ये घुसलीसुध्दा होती.....
- दरवाजात ढकलून रखमाक्का सरळ आत गेली व डॉ.ना म्हणाली, "लेकी, कशाला अधू करतीया माझ्या पूजीला.....एकतर आठ वरसातनं तीची कूस उजवतीया नि तू ह्यो काय ख्योळ खिळतीया.....!?? पैक्यासाठीच ना?? तर तू पैकं घि खरं फाडाफाडी नगं करुस, आपसूक बाळंत कर गं लेकी...." हे ऐकताच डॉ.बाईंना त्या म्हाताऱ्या बाईच्या धाडसाचं जरासं कौतूकच वाटलं ..(खेडेगावात अजूनही सिझेरीयन म्हंटलं की लोक घाबरतात.... आणि ते बरोबरच असतं कारण घरात - शेतात काम करावं लागतं...सिझरचा त्रास होतो अशी कामं करताना..त्यात आजकालच्या तब्येत स्लीम् - मेन्टेन ठेवण्याच्या नादात मोजून मापून खाणाऱ्या पोरीं तर अगोदरच पाप्याच्या पितर झालेल्या असतात हा भाग वेगळाच !! ) सर्रास मेडिकल क्षेत्रात काय घडतंय तेच तर रखमाक्का सडेतोडपणे बोलत होती.....
पण यावेळी मात्र ही 'केस' खरोखरच क्रिटीकल होती ...त्या हसत उठल्या नि रखमाक्काला खूर्चीवर बसवत तीला म्हणाल्या, "अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे काही अंशी....तुम्ही म्हणता तसं घडतंही कधी कधी पण......." यावर त्या डॉक्टरचं वाक्य मध्येच तोडत रखमाक्का म्हणाली,"पण नाय आण बिन नाय्......नारमलच हुंदी." डॉ.नी डोक्यालाच हात लावला. रुग्णांच्या गैरविश्वासाला आपण डॉ.च कारणीभूत आहोत, हे त्यांना पटत होतं...आपणही मागं कित्येकदा असं केलं होतं, हे आठवून त्यांना आता पश्चाताप होत होता.....त्या शेवटी इतकंच म्हणाल्या,"आपण फार फार तर दहा मिनिटे थांबू शकतो..पण बाळाच्या अगर आईच्या जीवास काही धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल.."
- तेवढ्यात घाईगडबडीने केबीनचा दरवाजा उघडून अविनाश आत आला...त्याच्याकडं प्रश्नार्थक नजरेने डॉ.नी पाहिलं..तसं अविनाशने आपली ओळख करून दिली..त्याला बसायला सांगून रखमाक्काला बाहेर जाण्यास सांगितले .
अविनाश पुरता घाबरुन गेला होता..त्याने टेबलावरील ग्लासातील पाणी पिले ...तेव्हा डॉ.नी त्याला सर्व परिस्थिति समजवून सांगितली..व म्हणाल्या,"तुमच्या माणसांना समजवा नाही तर काही तरी बरंवाईट घडेल" हे ऐकताच अविनाश कळवळून म्हणाला,"डॉ. तुम्ही करा सिझेरियनची तयारी..."
"ओके तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल..बाहेर कॉऊंटरवर जा" असं डॉ. म्हणाल्या तोवरच एक नर्स घाबऱ्या चेहऱ्यानं धावत पळतच आत आली नि तीने डॉ.ना लवकर O.T.मध्ये येण्याची विनंती केली... डॉ. हातावर ग्लोज चढवतच O.T.त घुसल्या...तर अविनाश खिन्न मनाने कॉऊंटरकडे गेला...थोड्याचवेळानं डॉ.नी अविनाशला O.T. रुममध्येच बोलावून घेतले. घामेजलेल्या चेहऱ्याने व धडधडत्या हृदयाने मनात देवाच्या धावा करत अविनाशने त्या वातानुकूलित रुममध्ये प्रवेश केला... एकदम भयाण शांतता होती आतमध्ये... ऑपरेशन टेबलवर अर्धविवस्त्र अवस्थेत पूजा तळमळत असाह्य नजरेने त्याच्याकडेच बघत होती. मोठ्या कष्टाने त्याने फक्त एकदाच तीच्या नजरेला नजर दिली.नि डॉ.पुढे येऊन उभा राहिला....डॉ.पूजापासून जरा बाजूला येत हळु आवाजात म्हणाल्या, "ही बघा बाळानं आतमध्ये 'शी' केलीय...त्यामुळेच ते पिवळं दिसतं...त्याच्या नाकातोंडातही तो द्रव गेला असण्याची शक्यता आहे... त्यामुळे काय काय होऊ शकते याच्या अनेक शक्यता जरी असल्या तरी, मी तुम्हाला यासाठी आत बोलावून घेतलं की,जर समजा काही क्रिटीकल समस्या निर्माण झालीच नि दोघांपैकी जर एकालाच वाचवता येऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण झालीच तर कोणाला वाचवायचं...?" या प्रश्नाने त्या थंड वातावरणातही अविनाशच्या घशाला कोरड पडली. त्याने टेबलावर ग्लानी अवस्थेत पडलेल्या पूजाकडे एकवार पाहिले नि 'बाळाच्या आईलाच प्राधान्याने वाचवा' असं सांगितले.
नर्सने परत एकदा त्याची कसल्या तरी कागदावर सही घेतली व त्याला बाहेर जायला सांगितले. त्याने बाहेर जाता जाता परत एकदा पूजाकडे पाहिले तर तीच्या डोक्यावरच भिंतीवर एक आई मोठ्या समाधानाने आपल्या बाळाला 'स्तनपान' करत असल्याचं 'पोर्ट्रेट' होते त्यावर त्याचं लक्ष गेलं नि त्या चित्रातील गोंडस बाळावरच त्याची नजर स्थिरावली...आणि आपण योग्यच निर्णय घेतला की नाही असं वाटू लागलं . द्विधा मनस्थितीत तो बाहेर आला..सगळे त्याच्याभोवती गोळा झाले पण तो कोणाशी काही न बोलता एका कोपऱ्यातल्या सोफ्यावर जाऊन बसला.
बसल्या बसल्या त्याच्या डोळ्यासमोर ते O.T.मधले चित्र येत होते व त्याचं मन कधी आईकडे झुकत होतं तर कधी बाळाकडे! त्याचा जीव कात्रीत सापडला होता... त्याने एक उसासा घेत डोकं मागे भिंतीला टेकवलं व त्याचं मन भूतकाळात डोकावू लागलं... -
'नवीनच लग्न झालं होतं आणि पहिल्या तीन-चार महिन्यांतच एका रात्री लडिवाळपणे पूजा अविनाशच्या कानात कुजबुजली..."अवि..ऐक ना ! एक गुड न्यूज आहे.." आणि त्याच्या हातावर एक प्लास्टिक पट्टी टेकवली.अविनाशने ओळखले ती कव्हरमध्ये गुंडाळलेली पट्टी कशाची ते!! त्यासरशी अविनाश ताडकन् बेडवर उठुनच बसला ...व जवळ जवळ किंचाळलाच , " ए पूजा ! काय गं ?? तुला एवढं पण नाही कळलं... अशावेळी काय करायचं असते ते....किती दिवस झाले..?" यावर पूजा म्हणाली, नेहमीप्रमाणे सहा तारखेच्या आसपास 'ती' यायला पाहिजे होती पण आज एक आठवडा उलटला तरी नाही आली" - "आणि हे तू मला आता सांगतेयस ?" असं काहीसं चिडक्या स्वरात अविनाश बोलला. त्याचा तो पवित्रा पाहून पूजा घाबरून गेली. तीला वाटलं होतं की; 'मी हे सांगताच अवि किती आनंदित होईल...!!? तसंच दोन्ही घरचेही किती आनंदित होतील, माझे किती कोडकौतुक करतील !?, माहेरी गेल्यावर तर शेजारच्या वहिनी व मैत्रिणीं आपल्याला चिडवून चिडवून नाकी नऊ आणतील ' असं बरंच काही वाटलं होतं ..दिवसभर नुसता हाच विचार .त्या आनंदात आज तीला फारसं जेवणही गेलं नव्हतं ..कधी एकदा रात्री अविला हे सांगतीये असं झालं होतं. पण झालं मात्र उलटंच!
अवि तीच्या जवळ जात शक्य तितक्या शांत व समजावणीच्या सूरात तिला म्हणाला,"अगं आता तर आपलं लग्न झालंय ....मस्त एकमेकांच्या सहवासात राहुया, एकमेकांना जाणून घेऊया, छान छान ठिकाणी फिरायला जाऊया, तारुण्य एंजॉय करुया... आपल्या पुढं उभं आयुष्य पडलंय मुलंबाळं जन्माला घालायला..." आणि तीला अलगद बाहुपाशात खेचत हसत हसत पुढे म्हणाला, "एवढ्यात आपण म्हातारे होणार आहोत थोडेच..!!?" पण पूजाला त्याचं 'मत' आपल्यावर लादणं आवडलं नाही...'तुला काय वाटतं ?' असं साधं विचारलंही नाही,याचे तर तीच्या फारच जिव्हारी लागलं....तसंच अविनेही मुलांबाळांबाबत त्याला काय वाटतं हे आगोदर कधी शेयर केलंच नव्हतं...मग मात्र तीने ही गोष्ट इतर कोणालाच सांगितली नाही. तसेच ती दोन-चार दिवस अविशी फारशी बोललीही नाही आणि अविनाशही नव्यानेच सुरू झालेल्या साइटच्या कामात व्यस्त होता.सकाळी लवकर जायचा आणि रात्री उशीरानेच घरी यायचा... त्यामुळे त्यांचं त्या विषयावर बोलणंही झालं नाही.
एके दिवशी घरकाम करता करता पूजा 'भोवळ' येऊन पडली आणि ही बातमी संध्याकाळी अवि घरी आल्या आल्या त्याच्या आईने त्याला सांगितली व उद्या पूजाला दवाखान्यात घेऊन जा असं निक्षूण बजावलं. दुसऱ्याच दिवशी अविनाश पूजाला घेऊन सरळ एका परिचयाच्याच गायनॅक कडे घेऊन गेला. तिथं कन्सल्टींग रुममध्ये एकदंर परिस्थिती ऐकून डॉ.म्हणाले, "हे पहा तुम्ही शिकली सवरलेली सुशिक्षित मुलं, अशी परिस्थिती निर्माण होऊच नये म्हणून काय प्रिकॉशन घ्यायची असते; हे माहित असूनही ती तूम्ही घेत नाही.....एखादं अडाणी 'जोडपं' असेल तर ठिक ...पण आजकाल जमाना बदलला आहे....ती लोकसुद्धा योग्य ती काळजी घेतात नि तुमच्यासारखी अनवधानाने न म्हणता जाणूनबुजूनच दुर्लक्ष करता असं वाटतं. माझ्याकडे आठवड्यातून एकदोन तर अशा केसेस येत असतात आणि तुम्हाला स्पष्टच सांगतो...त्यांना 'प्रिकॉशन' घेतली की पाहीजे तसा 'फिल' येत नाही म्हणे ...आता बोला....!" या वाक्यासरशी पूजाने सूचक अर्थाने अविकडे पाहिलं, तेव्हा अविने तीच्या नजरेपासून आपली नजर चोरली आणि हे डॉक्टरांच्या मुरलेल्या नजरेतून सुटलं नाही....ते पुढे हसत म्हणाले, "डोन्ट वरी..! ...तर मला काय सांगायचे आहे.. आता जवळ जवळ दोन महिने होत आले..पाळी चुकल्या चुकल्या आला असतात तर 'मेडिसीन' दिलं असतं; पण आता तसं आपल्याला करता येणार नाही...अबॉर्शनच करावं लागेल " हे ऐकताच पूजा व अविनाशही घाबरले ..... डॉ.पुढे म्हणाले,"त्यापेक्षा तुम्ही अजून विचार करा... माझं तर हे कामच आहे , तसं तुम्हाला समजावणं व योग्य निर्णय घ्यायला मदत करणं हीसुद्धा माझी जबाबदारी व कर्तव्य आहे.....दोन महिने होत आलेत, मला वाटतं तुम्ही 'अबॉर्ट' करु नये.....संसारातील एक महत्त्वाची नि आवश्यक पायरी आहे..तुमच्यासारखाच अविचार करुन अनेक जोडपी सुरुवातीला देवाचं 'दान' लाथाडतात आणि मग 'वेळ' निघून गेल्यावर वर्षांनुवर्षे आयुष्यभर दवाखान्याच्या, मंदिरांच्या,साधूबुवाबाबांच्या मठांच्या पायऱ्या झिजवतात... पण दुर्दैवाने एकदा लाथाडलेलं परत पदरात न मिळाल्याने एकांकी कुढत, निपुत्रिक, चरफडत जीवन जगतात, आणि मरतात...तेव्हा घरी जा, घरच्या लोकांशी चर्चा करा, शांत डोक्याने विचार करा...व मला तुमचा निर्णय सांगा..तुमचं मत बदलले तर चांगलंच आहे आणि जर तेच ठाम राहिले तर उद्या सकाळी येताना उपाशी पोटी या... एक तासभर लागेल त्यासाठी... पण दिवसभर इथंच रहावं लागेल, मग संध्याकाळी घरी सोडलं जाईल.." डॉक्टरांचा निरोप घेऊन ते घरी जायला निघाले.जाताना कोणीच एकमेकांशी बोलले नाही...घरी गेल्यावर सर्वांनी विचारलं काय म्हणाले डॉ.? तर अविच बोलला,"काही विशेष नाही.... अशक्तपणामुळं ..! "
रात्री पूजानं परत एकदा समजावलं पण अवि काही ऐकून घ्यायला तयार झालाच नाही ..त्याचा निर्णय ठाम होता. तो सरळ तीच्याकडे पाठ फिरवून झोपी गेला. पूजा मात्र रात्री उशिरापर्यंत जागीच होती...त्या डॉक्टरांचे शब्द कानात घुमत होते..पण ती असह्य होती....डोळ्यातून ओघळणारे पाणी डोक्याखालच्या उशीवर जमा होत होतं आणि तहानेनी व्याकूळल्यासारखी उशी ते पित होती....
सकाळी लवकर आवरून दोघेही 'एका मित्राच्या फॅमिलीला भेटायला जातोय, रात्री यायला उशीर होईल', असे सांगून दिलेल्या वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहचले ...आतमध्ये डॉ.समोर गेल्यावर त्यांनी दोघांचं हसत स्वागत केलं ...व म्हणाले, "बोला ..काय ठरलं मग ?" यावर निर्विकारपणे अवि म्हणाला,"आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत...." ते ऐकताच पूजा चटकन पोटतिडीकेने म्हणाली, "'आम्ही आमच्या' म्हणू नका ...'मी माझ्या' म्हणा..." अविनाश पुरता गडबडून खाली मान घालून बसला .. डॉक्टरांनी पूजाला काय म्हणायचं आहे ते ओळखले आणि एकदम हसत पूजाला म्हणाले, "ओके..तुमचं तेच ठाम मत असेल तर ...'डोन्ट माईंड'! तुम्ही अजून तरुण आहात.." डॉक्टरांनी मग काही फॉरमॅलिटीज् भरुन घेऊन पूजाला डिलीव्हरी रुममध्ये जायला सांगितले ....पूजा अश्रू भरल्या डोळ्याने अविकडे बघत बघत गेली पण अविने काही तीच्याकडे पाहिले नाही.....
तासाभरानंतर पूजाला स्ट्रेचर वरुन बाहेरच्या 'कॅज्यूलिटीरुम'मध्ये शीफ्ट करण्यात आले. अवि तीच्याजवळ जाऊन बसला तेव्हा ती भूलीच्या ग्लानीतच होती....व असबध्द बडबडत होती ..तीची ती अवस्था बघून अविला आता मात्र रडू कोसळले तो घाबरला व डॉक्टरांना जाऊन भेटला ... डॉ.म्हणाले,"घाबरु नका भूल उतरेपर्यंत असं होणारच.... अबॉर्ट करताना सुध्दा सगळं डिलीव्हरी सारखंच करावं लागते ....आता काळजी घ्या त्यांची व 'त्या'बाबतीत ही..!!" अविनाशने मान डोलावली व तो परत तीच्याजवळ येऊन, तीचा हात आपल्या हातात घेऊन अपराधी मनाने बसून राहिला. तीची ती तडफड, बडबड बघून मात्र 'आपण चूकीचा निर्णय घेतला' असं त्याला वाटू लागले...पण आता तसं वाटून काहीच उपयोग नव्हता... सकाळपासून तोही उपाशीच होता... संध्याकाळी सातला 'डिस्चार्ज' घेऊन ते प्रथम एका हॉटेलमध्ये गेले ..पूजाला थोडं थोडं दुखतच होतं..मग तीथे एक छानशी रुमच घेतली..... तिथं नऊपर्यंत आराम करुन पूजाचा त्रास बऱ्यापैकी कमी झाल्यावर थोडंसं हलकं जेवण करून ते घरी परतले; तेव्हा दहा साडे दहा वाजले होते...कुणाशी फारसे काही न बोलता ते सरळ बेडरुममध्ये जाऊन झोपी गेले..पूजा भूलीच्या प्रभावाने व शारीरिक थकव्याने लवकर झोपी गेली...पण अवि डोळे सताड उघडे ठेवून पडला होता........
पुढे काळाच्या ओघात ही गोष्ट पुसटशी होत दोन-तीन वर्षे गेली.या कानाचं त्या कानाला कळालं नाही... या दरम्यान पूजा कोल्हापुरातच एका नामांकित वकिलाला 'असिस्ट' करु लागली होती. तर अविनाशनेही आपला व्याप बराच वाढवला होता. आणि आता मात्र अविला आपण 'आईबाबा' व्हावं असं वाटत होते. त्याने तसं पूजाला बोलूनही दाखवले पण पूजा फक्त त्याच्याकडे पाहून कुत्सित हसली....खूप प्रयत्न करुन ही काही जमेना....यात आणखीन एक वर्ष निघून गेलं तेव्हा त्यांनी डॉ.रांच्या कडे जायचे ठरवले . त्या हॉस्पिटलमध्ये ते परत एकदा तब्बल चार वर्षांनी आले होते...सगळ्या जून्या आठवणी ताज्या झाल्या..जसं काही काल परवाच घडलं होते इतक्या स्पष्ट! त्यांचा नंबर येताच आत गेले. डॉ.नी त्याचं हसत हसत स्वागत केलं ...'काय कसं काय चाललेय' असं जुजबी बोलता बोलता डॉक्टरांनी विचारलं "मागचीच चूक पुन्हा झाली कि काय !? " यावर अविनाश हसत म्हणाला, "सर आम्हाला आता ती 'चूक' करायचीय पण घडेना" यावर पूजा लगेच निर्विकारपणे म्हणाली, "आम्हांला नाही फक्त तुम्हाला.." यावर अविनाशने हादरुन तीच्याकडे पाहिले...आता ती पूर्वीची पूजा राहिली नव्हती .... डॉक्टरांनी दोघांनाही शांत रहायला सांगितले...व पूजाला बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली,"मला हवं होतं तेव्हा यांना नको होतं ...आता त्यांना हवं आहे पण मला नकोय" यावर अवि म्हणाला,"पण का?" तेव्हा ती म्हणाली,"मला माझं करिअर घडवायचं तुझ्या बोटांवर नाचायचं नाही..जसं तुला तुझं मत होतं तसं मलाही माझं होतं... पण तेव्हा तू माझा विचार केलास ??? मग मी आता का तुझा विचार करु!!? अजून एक वर्षभरात मी माझं स्वतंत्र ऑफिस उघडेन .. तेव्हा बघू " असं म्हणून ती तडक बाहेर येऊन कारमध्ये बसली. डॉक्टरांकडे झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करुन अवि बाहेर आला व गपचूप गाडी स्टार्ट केली...व तीला तीच्या फर्मवर सोडून सरळ घरी निघून गेला....
मग वर्षभरात मोठ्या जिद्दीने, मेहनतीने पूजाने स्वतंत्र ऑफिस थाटले आणि तीच्याही मनात आता 'मातृत्व' परत एकदा उफाळून येऊ लागलं ...कारण ती एक स्त्री होती. तसं तीला नेहमीच वाटायचंच पण अविवर 'सूड' उगवायचा म्हणूनच ती तसं दाखवत नव्हती....मात्र तीने लग्नाच्या सहाव्या ॲनिव्हर्सरीला अविला शेवटी तसं सांगितलेही ...अविला तर 'स्वर्ग' फक्त दोनच बोटं उरला होता. त्यांच्या नात्याचा जणू पुनर्जन्मच झाला होता....!! तो आता पूजाला खूप जपायचा..तिला खूप खूष ठेवायचा प्रयत्न करु लागला. पण त्यांची वंशवेल काही फलद्रूप होईना....एकदोन वेळा पहिल्या एक-दोन महिन्यांच्या आतच 'मिसकॅरेज' झाले ....आणि त्यानंतर होणारा जीवघेणा त्रास याने पूजा खूप त्रस्त झाली होती. 'वांझ' म्हणून टोमणेही ऐकू येऊ लागले कळत नकळत..! त्यामुळे तीने कामाव्यतिरिक्त कुठं जाणं जवळपास बंदच केलं....शेवटी डॉ.कडे जाऊन चेक-अप केलं तेव्हा पूजा अविच्या नकळत नेहमी 'कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स' घ्यायची हे उघड झाले आणि त्यामुळेच तीच्या प्रजनन संस्थेवर त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट झाला असल्याचे निदान झाले. ते ऐकताच अवि व पूजा पुरते कोलमडून गेले. पूजाने अविची मनापासून माफी मागितली...पण आता वेळ तर निघून गेली होती. नवऱ्यावर कुरघोडी करण्याचा मानस व उत्तरास या चूकीच्या कृतीने प्रतिउत्तर देण्याने तीच्या 'आई' होण्याचाच प्रश्न निर्माण झाला . पण यासर्व घडामोडीच्या मूळाशी वास्तविक पाहता सुरवातीचा आपला तो 'ॲबॉर्शनचा' अविचारच आहे, हे अविलाही जाणवलं.. तो स्वत:ला अपराधी समजू लागला. भावनिक व मानसिक दृष्ट्या ती दोघंही फार कमकुवत झाले.
नियतीने आपला पाश त्यांच्यावर चांगलाच आवळायला सुरुवात केली होती, नि त्या डॉक्टरांचे शब्द खरे ठरु लागले होते. पूजाला कशातच मन रमेना; तिनं ज्या करियर साठी आपलं 'मातृत्व' पणाला लावलं होतं, तेच तीला आता नकोसं वाटू लागलं. मग तीने नावारुपाला आलेला वकीली व्यवसाय सोडून दिला..एकदम कफल्लक वृत्तीच आली.....
अविनाश मग तीला घेऊन मुंबईला एका नामांकित डॉ.कडे गेला....तब्बल सहा महिने योग्य डाएट, मेडिसीन व मेडीटेशन या 'ट्रिफल फॉर्म्युल्या'च्या फॉलोअपनंतर पुजा थोडी सावरली... आणि मगच डॉक्टरांनी त्यांना चॅन्स घेण्यास हरकत नाही असं सांगितलं.. आणि लवकरच नविन पाहुण्याची चाहूल लागली....बघता बघता सहा सात महिने झाले .. दरम्यान डोहाळ्यांचा कार्यक्रमही झाला. अवि तर हवेतच होता...आता तर तो तीची खूपच काळजी घेऊ लागला... यामुळेच डिलीव्हरी साठी पूजाला माहेरी पाठविण्यास तो तयार नव्हता... पण दोन्हीं घरच्यांसमोर त्याचं काही चालले नाही.त्याने नाईलाजानेच होकार दिला होता...आणि आता पुजा OT मध्ये होती...........त्याला सगळं सगळं आठवतं होतं. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि अवि भूतकाळातून वर्तमानात आला... '
- त्याने शेजारी बघितलं तर नाना ! नाना त्याच्याशी काहीच बोलले नाहीत पण त्यांचा मूकस्पर्शच अविनाशला खूप काही बोलून आधार देऊन गेला.... 'काळाच्या गर्भा'त काय दडलं होतं कोण जाणे..??!! पण सध्या पूजाच्या गर्भात काय नि कसं होत असेल? या विचाराने अविनाशचे लक्ष राहुन राहून सारखं OTबाहेरील दरवाजावर पेटलेल्या लाव दिव्यावरच जात होते....मध्येच उठून अविनाश हॉस्पिटलच्या कॉरीडॉरमध्ये येरझाऱ्या घालत होता...तेव्हा बाजूच्या वार्डमध्ये एका नवजात बाळाला त्याची आई मोठ्याने प्रेमानं कुरवाळत.. बोबड्या बोलाने त्याच्याशी बोलत होती....ते दृश्य पाहून त्यालाही जरा बरं वाटलं..आता माझाही अंश अवतरेल ...आम्हीही असंच त्याच्याशी असंच प्रेमानं बोलू ...असे स्वप्न रंगवत असतानाच ...तो दिवा कधी बंद झाला हे लक्षात आलेच नाही आणि डॉ.दार उघडून बाहेर आलेल्या ....
अविनाशने लगबगीने त्यांच्या पाठीमागे जात बोलण्याचा प्रयत्न केला... डॉ.नी त्याला कन्सलटींगरुम मध्ये येण्यास सांगितले.
अविनाशने आता गेल्या गेल्या पूजाची चौकशी केली. डॉक्टर म्हणाल्या, "त्या ठिक आहेत.. अभिनंदन तुम्हाला मुलगा झालाय...पण........."
-" पण काय डॉक्टर???"अविनाश अधीरतेने म्हणाला.
"बाळ जन्मल्यानंतर म्हणावं असं रडलंच नाही...त्याच्या तोंडात तो द्रव थोडाफार गेला होता...तो सक्शन करुन काढला आहे ..पण बहुधा त्याच्या छातीत राहिला असेल ......श्वसनाला त्रास होत आहे त्याला...त्याला काही काळ ICU इंक्युबेटर म्हणजे काचेत ठेवावे लागेल"..
"पण बाळाच्या जीवाला काही धोका तर नाही ना..?" अविनाशने विचारले ...
डॉ. -"अहो ..तसंच काहीसं आहे म्हणून तर इंक्यूबेटरमध्ये ठेवलेय ना.....! अगोदर लवकर डिसीजन दिला नाहीत सिझरचा ..त्याला आता मी काय करू.....त्याच्यासाठी आता इथून पुढचे चार-पाच तास खूप महत्त्वाचे आहेत...यात जर ते स्थिर झालं तर नो प्रोब्लेम...!" असं म्हणून डॉ. रुमबाहेर पडल्या....
बराचवेळ अविनाश मग तिथेच बसून राहिला.....सगळा 'जर- तरचा खेळ' होता.. 'उगाच पूजाला माहेरी पाठवलं 'असं त्याला वाटू लागलं ...पण आता तो विचार करुन काय उपयोग !? असं आपल्याच मनाला समजावत नि करंट्या नशिबाला कोसत तो बाहेर आला...सगळे परत त्याच्याभोवती गोळा झाले...पण कोणच काही बोललं नाही; कारण तो आत असताना, बाहेर नर्सने सगळं अगदी स्पष्ट सांगितले होतं...बाळाच्या या स्थितीला रखमाक्का स्वत:लाच दोष देत हॉस्पिटलमध्येच असलेल्या छोट्याशा श्री.गणेशाच्या मंदिरात 'धरणं' धरुन बसली होती.....नाना तीला समजवत होते ...तर वत्सलाबाई पूजाच्या रुममध्ये गेल्या होत्या...
अविनाश पूजाच्या रुममध्ये जाताच वत्सलाबाई उठून बाहेर गेल्या नि मग अविनाश अर्धग्लानी अवस्थेत असलेल्या पूजाजवळ जाऊन बसला...त्याने हळूवारपणे तीच्या हातावर हात ठेवला तसं तीने चमकून वरती पाहिलं आणि त्याला पाहताच कण्हत बोलू लागली.."अवि मला सोडून नको जाऊस ....मला माफ कर ...मी गोळ्या खायची रे तुझ्या नकळत...म्हणून लवकर बाळ होत नव्हतं आणि आता बाळ झालंय तर जन्मत:च त्याच्या जीवावर बेतलंय रे...... आपल्या बाळाला काही होणार तर नाही...ना..?! आपण ना ! त्याला खूप छान संभाळून ... त्यांच्यासाठी स्पेशल 'किड्स रुम' क्रिएट करुन घेऊ आपल्या मास्टर बेडरूमच्या बाजुलाच.... आणि त्याचं ना ..नाव आपण काय ठेवायचे सांगू....!!? प्रतिक ..आपल्या दोघांचं 'प्रेम प्रतिक'...!! मला आपलं बाळ बघायचं आहे , ये तू पाहिलंस का? कसा दिसतो.?......तुझ्यासारखा की माझ्यासारखा? ..... पण तूलाच आगोदर बाळ नको होतं ....मग मला नको होतं आणि आता ......... ..'असं खूप काही बडबडता बडबडता अचानक रडू लागली.....अविने हलकाच तीच्या तोंडावर हात ठेवला...अविने भरल्या डोळ्यांनी तीला कसंबसं समजावलं ....."होईल सगळं ठीक .... डॉ . म्हणालेत काही काळजी करण्यासारखे कारण नाही..." पूजाने अविश्वासाने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, "मग त्याला इंक्युबेटरमध्ये का ठेवलंय????? ...हा प्रश्न ऐकताच तो पार गडबडून गेला .... अविने तिच्या नजरेला नजर देण्याचं टाळलं... इतक्यात काहीतरी मेडीसीन द्यायला नर्स आतमध्ये आली आणि 'पेशंटने बोलायचं नाही फार इतक्यात' असं म्हणत अविला बाहेर जाण्यास सांगितले...तसं अविलाही पूजाच्या जीवघेण्या प्रश्नांना उत्तरं देणं जीवावर आलंच होतं ..तो धुसर दृष्टीने नि खिन्न मनाने चटकन बाहेर आला.....
आता सगळं देवाच्या हवाली होतं. जेव्हा माणूस सर्व बाजूंनी हतबल होतो, तेव्हा तो एका अदृश्य शक्तीला शरण जातो आणि ती 'शक्ती' म्हणजेच आपण ज्याला मानतो तो 'देव' ! अविनाशचे पाय आपसूकच गणेशाच्या मंदीराकडे वळले.....तिथं जाऊन बसल्यावर त्याला बरं वाटू लागले..थोडं मन स्थिर झाल्यावर त्याला बाळाची आठवण आली नि वरच्या मजल्यावर ज्या रुममध्ये त्याच्या बाळाला ठेवलं होतं तिकडे तो जाऊन पोहचला ...एका काचेच्या भिंती पलिकडे त्याचं बाळ होतं ..पण त्या रुममध्ये अनेक बाळं काचेच्या पेटीत बंद होती....त्यात आपलं बाळ कोणतं हे त्याला कळायला मार्ग नाही ...सगळी सारखीच दिसत होती अगदी शांत. जन्माला आल्या आल्याच त्यांची एका काचेच्या बंदीशाळेत रवानगी झाली होती.....
तो लगबगीने त्या कॉरिडॉरमध्येच असलेल्या रिसेप्शन कॉउंटरवर गेला नि स्वत:ची ओळख करून देत 'एक-दीड तासांपूर्वी जन्मलेले पूजा पाटिल याचं बेबी इथं कुठं आहे ?' हे विचारलं ...तिने पहिल्या रो मध्ये ३नं ला असं नेहमीच्या सरावाने सांगितले....तो परत त्या काचेच्या तावदानातून पलिकडे निरखून पाहू लागला...त्याचं 'बाळ' अखेर त्याला दिसलं ...त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...त्याला ते OT मधलं चित्रातील बाळ आठवले...अगदी त्याच्यासारखंच भासू लागलं होतं ! पण ते होतं आईच्या कुशीत नि माझं बाळ.........'गोरंगोरं अंग, कपाळावर काळेभोर केस पण कृश शरीर नि भात्यासारखी वेगाने वरखाली होणारी त्याची छातीच अधिक लक्ष वेधून घेत होती....त्याच्या 'प्रेमाचं प्रतिक' जगाच्या उंबरठ्यावर येऊन थबकलं होतं ..... आपल्या चूकांचं प्रायश्चित्त आपल्या बाळाला भोगावं लागतेय असं त्याला वाटू लागले....त्याला असंच बघत रहावं असं वाटत होतं पण त्या रिसेप्शनिश्टने येऊन त्याला खाली जाण्याची विनंती केली....'तुमच्यासारखीच इतरांचीही बाळं इथे आहेत...काळजी करु नका ...आम्ही आहोत' ! मग मात्र त्याला जावंच लागलं ..पण जाता जाता काकुळत्या आवाजात म्हणाला, "ताई माझ्या बाळावर लक्ष ठेवा' ती फक्त निर्विकारपणे पहात राहिली. कारण तीच्यादृष्टीने तर असले प्रसंग, नातेवाईक म्हणजे 'डोकीदुखी' नेहमीचीच...!!
तो खाली जाऊन मंदिराच्या बाकड्यावर जाऊन बसला नि बाळाचा विचार करत करत तिथंच त्याचा डोळा लागला..... आणि त्याला स्वप्न पडलं ...त्याचा प्रतिक मोठा झाला होता चांगला चार-पाच वर्षांचा ..तो आणि अवि दोघं लपंडाव खेळत होते. नि आता राज्य अवि वर आलं होतं ..प्रतिक जाऊन कुठंतरी लपला होता नि अवि त्याला सगळ्या घरभर शोधत होता. पण तो त्याला कुठेच सापडत नव्हता. पूजा किचनमध्ये कामात गुंग होती. अवि त्याला हाक मारत बाहेर बागेत आला .....इकडे तिकडे शोधत तो फिरत असताना त्याला घरामागच्या जून्या पडक्या आडाच्या बाजूने पुसटसा आवाज ऐकू येऊ लागला. तो धावत पळतच तिकडे गेला तर आडातूनच 'बाबा मला वाचव' असा आवाज येत होता..प्रतिक त्या जूनाट आडाच्या गाळात बुडत चाललेला होता नि तो जीवाच्या आकांतानं त्याच्या बाबाला हाक मारत होता....अविला सुचत नव्हतं काय करावं ते? तो रस्सी आणायला आत गेला व परत येऊन पाहतो तर काय प्रतिक गाळात गडप झाला होता .......
- नेमक्या त्याचवेळी नाना त्याला हलवत जागे करत होते आणि तो भानावर आला ....ते म्हणाले , "अविनाशराव चला ! डॉ.नी बोलावलं आहे " अविला काहीच कळेनासं झाले होतं ...तो गोंधळून म्हणाला," अहो ! मी आताच तर भेटलो होतो त्यांना " यावर नाना म्हणाले, अविनाशराव तुम्ही डॉ.ना भेटून दोन तास उलटून गेले...चला.!" मग त्यानं अविश्वासाने घड्याळात पाहिलं तेव्हा त्याला पटलं ...मग तो व नाना डॉक्टरांच्या रुममध्ये गेले. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितलं व त्या पुढे म्हणाल्या, "आय् म् सॉरी मि.पाटील ....अनफॉरच्यूनिटली विई कान्ट ........" अविनाशला फक्त एवढंच ऐकू आलं....पुढंचं काही त्याला ऐकूच आलं नाही ...तो डोकं धरून तीथंच बसुन राहीला.....नाना उठून बाहेर गेले नि डॉक्टर त्याच्या जवळ येऊन पाठीवर थोपटत त्याच सांत्वन करुन निघून गेल्या.....
आता अविनाशच्या मनाला एकच प्रश्न पडला होता ....आता पूजाला हे कसं सांगू???
बाहेर राहुल व त्याचे मित्र हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळेच असं घडलंय म्हणत तोडफोड करायच्या पवित्र्यात होते......नाना त्यांना अडवत,समजवत होते....
वत्सलाबाई पूजाच्या रुमबाहेरच बसून रडत होत्या.तर रुममध्ये बेडवर 'आपलं बाळ कधी एकदा आणून मला दाखवतायत ? कधी मी त्याला माझ्या उराशी कवटाळून घेतेय' असा विचार करत, बाळाची स्वप्न रंगवत पूजा कण्हत पडलेली होती; वरच्या मजल्यावर नर्स त्या निष्पाप नवजात बाळाला इंक्युबेटरमधून बाहेर काढून एका पेटीत पॅक करत होत्या........तेव्हा इकडे मंदीरात रखमाक्का स्वत:च्या थोबाडीत मारुन घेत .....समस्त देवांना शिव्यांची लाखोली वाहत तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती.......
"सटवीचा लिखा, कधी नाय चूका!!
सटवीचा लिखा, कधी नाय चूका!!"
Comments
Post a Comment